स्नेहालय सांगलीचा ‘आरोग्यदान’ उपक्रम: श्यामनगर कुपवाड येथे नवीन सॅनिटरी पॅड सेंटरचा प्रारंभ
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
महिला सबलीकरण, आरोग्य जनजागृती आणि सामाजिक बांधिलकी जपत ‘स्नेहालय सांगली’ संस्थेच्या वतीने श्यामनगर कुपवाड येथे नवीन सॅनिटरी पॅड सेंटरचा शुभारंभ करण्यात आला आहे. या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी एमआयडीसी परिसरात काम करणाऱ्या गरजू महिलांना मोफत सॅनिटरी पॅड्सचे वाटप करण्यात आले. स्नेहालयचे अध्यक्ष धनंजय आरवाडे यांच्या संकल्पनेतून २०२२ मध्ये ‘स्नेह मोफत सॅनिटरी पॅड सेंटर’ची सुरुवात झाली असून, या उपक्रमाद्वारे दरमहा झोपडपट्टी भागातील ४०० हून अधिक महिला तसेच अनाथाश्रमातील मुलींना मोफत सॅनिटरी पॅड्स उपलब्ध करून दिले जात आहेत.
कोरोनाच्या काळात विविध रुग्णालयांमध्ये सेवा देताना महिलांच्या मासिक पाळीतील स्वच्छतेशी संबंधित अनेक गंभीर समस्या स्नेहालयच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आल्या होत्या. हलाखीची आर्थिक परिस्थिती आणि आरोग्याविषयीच्या ज्ञानाचा अभाव यांमुळे अनेक महिलांना मासिक पाळीदरम्यान अस्वच्छता आणि विविध आजारांच्या धोक्यांना सामोरे जावे लागत होते. या सामाजिक समस्येवर मात करण्यासाठी महिलांमध्ये मासिक पाळीबाबत स्वच्छता व जनजागृती निर्माण करणे आणि गरजू महिलांना नियमित मोफत सॅनिटरी पॅड पुरवणे या उद्देशाने या विशेष ‘आरोग्यदान’ उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कुपवाड येथील या कार्यक्रमाप्रसंगी स्नेहालयचे अध्यक्ष धनंजय आरवाडे, उपाध्यक्षा डॉ. ज्योती आदाटे आणि सचिव प्रा. राणी यादव यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते जीवन आदाटे, मनीषा सूर्यवंशी, निलम साळुंखे व मोठ्या संख्येने लाभार्थी महिला उपस्थित होत्या. विविध सामाजिक संस्था आणि दात्यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरीत्या सुरू आहे. मात्र, समाजातील वाढती गरज लक्षात घेता या सेवाकार्याचा विस्तार करण्यासाठी अधिक नागरिकांनी आणि सामाजिक संस्थांनी पुढे येऊन या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन स्नेहालयच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.