शिवसेना कुणाची? पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी
मुंबई : खरा पंचनामा
शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातील वाद अद्यापही प्रलंबित आहे. आज सर्वोच्च न्यायालयात यावर पुन्हा सुनावणी होणार आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाचा हे प्रकरण सर्वोच न्यायालयात अंतिम युक्तीवादाच्या टप्प्यावर आहे. ठाकरे सेनेने धनुष्यबाण चिन्ह जर आम्हाला मिळणार नसेल तर ते गोठवण्याचा युक्तीवाद गेल्या महिन्यात मांडला होता. त्यानंतर ऑगस्टच्या अखेरीस शिंदे सेनेकडून युक्तीवाद सुरू झाला.
त्यानंतर आजपासून पुन्हा एकनाथ शिंदेंचा युक्तिवाद सुरू राहणार असून त्यानंतर सॉलिसिटर जनरल निवडणूक आयोग आणि अन्य घटनात्मक संस्थांची बाजू सर्वोच न्यायालयासमोर मांडण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदेंच्या वतीने नीरज किशन कौल आपली बाजू मांडत आहेत. तर उद्धव ठाकरेंच्या बाजूने सुरू असलेला युक्तिवाद संपला आहे. आज पुन्हा दुपारी 2 वाजता या प्रकरणी सरन्यायाधीश सूर्यकांत, जॉयमला बागची आणि व्ही मोहना यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.
केवळ आमदारांच्या बहुसंख्येवर राजकीय पक्षाची मालकी ठरवता येणार नाही, पक्षाची संघटनात्मक रचना, मूळ घटना ही सर्वात महत्त्वाची असल्याचा युक्तीवाद ठाकरेंकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केला होता.
राजकीय पक्ष कोणता आहे हे ठरवताना विधिमंडळातील आमदारांची संख्या पाहणे गरजेचं आहे असं या आधी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या प्रकरणात विधिमंडळातील आमदारांची संख्या निवडणूक आयोगाने लक्षात घेतली, असा युक्तिवाद शिंदेंच्या वकिलांनी केला.
शिवसेनेच्या विचारांच्या विरोधात असलेल्या पक्षाशी युती करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतल्याने पक्षात असंतोष निर्माण झाला होता, असा दावाही शिंदेंच्या वकिलांनी केला. त्याआधारेच एकनाथ शिंदे यांनी आपलाच पक्ष मूळ शिवसेना असल्याचा दावा केल्याचं वकिलांनी सांगितलं.
दरम्यान, शिवसेनाप्रमुख पद हे 2013 पर्यंत होतं. पण बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर हे पद गोठवण्यात आलं होतं. त्यानंतर शिवसेना कार्याध्यक्ष हे पद अस्तित्वात आलं. उद्धव ठाकरे कार्याध्यक्ष असताना शिवसेनेत पक्षांतर्गत निवडणुका घेण्यात आल्या नाही.
एकाधिकारशाहीवर पक्षाचे कामकाज सुरू असल्याचा आरोपही शिंदेंच्या बाजूने करण्यात आला. त्यानंतर आजच्या युक्तीवादात कोणते मुद्दे मांडले जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.