तत्कालीन पोलीस अंमलदार कोमल धुमाळ टोळी दोन वर्षांसाठी संपूर्ण जिल्ह्यातून तडीपार
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगलीत मोठी कारवाई
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरात गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार आणि तत्कालीन पोलीस अंमलदार कोमल रामचंद्र धुमाळ आणि तिच्या टोळीतील इतर दोन सदस्यांना सांगली जिल्ह्यातून दोन वर्षांच्या कालावधीसाठी तडीपार (हद्दपार) करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी जारी केले आहेत. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ च्या तरतुदीनुसार ही कारवाई करण्यात आली असून यामुळे परिसरातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
या कारवाईअंतर्गत टोळी प्रमुख कोमल रामचंद्र धुमाळ (वय ३०), अमित रामचंद्र धुमाळ (वय ३५) आणि वैशाली रामचंद्र धुमाळ (वय ५१, सर्व रा. सुतार प्लॉट नं. १४, बाबर चाळ, पत्रकारनगर, कोल्हापूर रोड, सांगली) या तिघांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. या टोळीविरोधात सन २०२२ ते २०२५ या कालावधीत अवैध खाजगी सावकारी करणे, व्याजापोटी अडवणूक करून हत्याराचा धाक दाखवून खंडणी मागणे, लाथाबुक्क्यांनी मारहाण करणे, अपहरण करून जीवे मारण्याची धमकी देणे, बेकायदेशीर जमाव जमवून घातक हत्यारांनी गंभीर दुखापत करणे आणि मालमत्ता बळकावण्यासाठी गृह-अतिक्रमण करणे असे शरीराविरुद्धचे व मालमत्तेविरुद्धचे अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत.
कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या या टोळीचा बंदोबस्त करण्यासाठी सांगली शहर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी तडीपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे सादर केला होता. सदर प्रस्तावाची चौकशी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत यांनी सखोल चौकशी करून अहवाल सादर केला.
टोळीवरील गुन्ह्यांचे स्वरूप, त्यांच्या हालचाली आणि प्रतिबंधक कारवायांचा विचार करून, तसेच नैसर्गिक न्यायतत्वांचा अवलंब करत पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी तडीपारीचा अंतिम आदेश पारित केला. ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सांगली शहरचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर व त्यांच्या पथकातील अंमलदारांनी पार पाडली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.