'सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून वेद वदवत आहेत', राज ठाकरेंची ज्ञानेश कुमार आणि भाजपावर टीका; बॅलेट पेपर आणण्याची केली मागणी
मुंबई : खरा पंचनामा
भारताच्या निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त यांनी आपल्या दोन सहकाऱ्यांचे म्हणणे डावलून मनमानी पद्धतीने कारभार केल्याचे वृत्त द इंडियन एक्सप्रेसने शोधपत्रकारितेद्वारे समोर आणल्या नंतर देशभरात खळबळ उडाली.
विरोधकांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून सत्ताधारी भाजपाला धारेवर धरले आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही ज्ञानेश कुमार यांना लक्ष्य केले असून सत्ताधाऱ्यांना टोला लगावला आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, 'ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवले होते. आता सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून आपले वेद (?) वदवत आहेत. असो. गेले २ दिवस ज्ञानेश कुमार हे गप्प झालेत आणि त्यांना बोलते करणारे पण कुठेच दिसत नाहीत.'
राज ठाकरे पुढे म्हणाले, 'ज्ञानेश कुमार यांच्यासारख्यांना हाताशी धरून आपण कसे सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलोत हे भारतीय जनता पक्ष सांगत होते, हे लक्षात आले असेल आणि यासाठी त्यांनी २०२५ पासून एसआयआर हे नवे अस्त्र हाती घेतले आहे.
'एसआयआरमध्ये काय घोळ झालेत आणि यावर निवडणूक आयुक्तच बोलत आहेत हे बघितल्यावर, एकच पर्याय दिसतो तो म्हणजे ही एसआयआरची संपूर्ण प्रक्रियाच रद्द केली गेली पाहिजे आणि यासाठी देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ही मागणीच आहे की आता झालेले एसआयर पूर्ण रद्द करा, त्यात कसे घोळ झाले याची निष्पक्ष चौकशी करा आणि नव्याने ही प्रक्रिया करा', अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.
'तसेच यापुढे सर्व निवडणुका व्होटिंग मशिनवर न घेता पुन्हा बॅलेट पेपरवरच घेण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन मोठे आंदोलन उभे केले पाहिजे ! तरच इतक्या वर्षांच सत्तेचे सत्य बाहेर येईल', असे सांगून राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा मुद्दा पुढे केला.
'द इंडियन एक्स्प्रेस'ने केलेल्या शोध पत्रिकारितेत निवडणूक आयोगातील धक्कादायक बाब उघडकीस आली. तीन सदस्यीय निवडणूक आयोगामध्येच 'एसआयआर'शी संबंधित मुद्द्यांवरून गेल्या १० महिन्यांत किमान १४ वेळा अंतर्गत नोंदींद्वारे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. विशेष म्हणजे, हे आक्षेप खुद्द तीनपैकी दोन निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी नोंदवले होते.
नवमतदारांची नोंदणी करणाऱ्या अर्ज क्रमांक सहाचे बदललेले स्वरूप, मतदार यादीतून नावे वगळणे वा नोंदवणे, एसआयआर प्रक्रियेतील काही बाबी तसेच मतदार याद्यांचे नवी दिल्लीत होत असलेले 'केंद्रीकरण' अशा गंभीर मुद्द्यांवर संधू आणि जोशी यांनी प्रतिकूल मतप्रदर्शन केल्याचे नोंदींवरून आढळते. तसेच आपला विरोध डावलून किंवा मत विचारात न घेता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी निर्णय घेतल्याची तक्रारच तीन सदस्यीय निवडणूक आयोगातील सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी कॅबिनेट सचिवांकडे केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.