Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सोने तारण ठेवून कर्जाचे आमिष दाखवून २ लाखांहून अधिकची फसवणूकमिरज ग्रामीण पोलिसांकडून एका आरोपीला अटक, ९८ हजारांचा मुद्देमाल जप्त

सोने तारण ठेवून कर्जाचे आमिष दाखवून २ लाखांहून अधिकची फसवणूक
मिरज ग्रामीण पोलिसांकडून एका आरोपीला अटक, ९८ हजारांचा मुद्देमाल जप्त

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

आरग (जि. सांगली): सोने तारण ठेवून २ लाख रुपयांचे कर्ज देण्याच्या बहाण्याने रोख रक्कम व मोबाईल हडप करणाऱ्या टोळीतील एका भामट्याला मिरज ग्रामीण पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. शशिकांत सिन्ना पवार (वय २२, रा. नरवाड रोड, आरग, ता. मिरज, जि. सांगली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून ८३ हजार रुपयांची रोख रक्कम आणि १५ हजार रुपये किमतीचे दोन विवो कंपनीचे अँड्रॉईड मोबाईल असा एकूण ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

या फसवणूक प्रकरणी आण्णासो उत्तम जाधव (वय ३१, रा. जाधववाडी कवठेमहांकाळ, ता. मिरज) यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
८ सप्टेंबर २०२६ रोजी आरग येथे दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी आण्णासो जाधव व त्यांचे सहकारी मित्र प्रवीण भंडारे आणि गणेश गंगाधर यांच्याजवळ चार अज्ञात इसम आले. आमच्याकडे ३ तोळे सोने असून ते ठेवून आम्हाला २ लाख रुपयांचे कर्ज द्या, असा बनाव रचून त्यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर सोने घेऊन येतो असे सांगून त्यांनी फिर्यादीला आरग येथे बोलावून घेतले आणि तुमच्याजवळील २ लाख रुपये रोख व २२ हजार रुपये किमतीचे तीन विवो मोबाईल आम्हाला द्या, आम्ही सोने घेऊन येतो असे सांगून रक्कम व मोबाईल घेऊन चौघेही पसार झाले.

या फसवणुकीबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४), ३१६(२), ११५(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
उपविभागीय पोलीस अधिकारी अजित कोकाटे आणि पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक या प्रकरणाचा तपास करत होते.

 तपासादरम्यान खास बातमीदाराकडून माहिती मिळाली की, संशयित आरोपी शशिकांत पवार हा आपल्या साथीदारासह शिंदेवाडी मार्गे कर्नाटकाच्या दिशेने पळून जाण्याच्या तयारीत आहे. या माहितीवरून पथकाने तातडीने शिंदेवाडी चेकपोस्टच्या अलीकडे सापळा रचून शशिकांत पवार यास शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील यांनी १० सप्टेंबर २०२६ रोजी त्यास अटक करून ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील, अतिरिक्त कार्यभार असलेले पोलीस निरीक्षक किरण चौगुले, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत संकपाळ, पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील तसेच पोलीस अंमलदार प्रवीण यादव, हेमंत ओमासे, शशिकांत जाधव, विकास भोसले, संग्राम पाटील आणि सविता डुबुले यांच्या पथकाने पार पाडली. या गुन्ह्यातील इतर फरार आरोपींचा मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडून वेगाने शोध घेतला जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.