जत तालुक्यातील डफळापूरमध्ये महापुरुषाच्या फलकावरून दोन गटांत तुफान हाणामारी
दगडफेकीत ७ जण जखमी, गावात तणावपूर्ण शांतता
पूजा फडके
जत : खरा पंचनामा
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील डफळापूर येथे महापुरुषाचे फलक हटवून दुसऱ्या ठिकाणी ठेवल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये भीषण हाणामारी आणि दगडफेकीचा प्रकार घडला आहे. गावातील मुख्य चौकात लावलेले महापुरुषाचे पोस्टर काढून भलतीकडे ठेवल्याने दोन्ही गटांतील कार्यकर्ते आमनेसामने आले. सुरुवातीला झालेल्या शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर काही वेळातच मोठ्या राड्यात झाले. दोन्ही बाजूंकडून झालेल्या तीव्र दगडफेक आणि हाणामारीत एकूण सात जण जखमी झाले आहेत.
हिंसाचाराची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासह पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले, मात्र या गदारोळात काही खाजगी वाहनांसह पोलीस वाहनांचेही दगडफेकीत मोठे नुकसान झाले आहे. घटनेतील जखमींवर स्थानिक स्तरावर प्रथमोपचार करून, गंभीर जखमींना तातडीने मिरजेच्या शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या घटनेनंतर डफळापूर गावात अत्यंत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र कर्फ्यूसदृश परिस्थिती पाहायला मिळत आहे. वातावरण अधिक चिघळू नये आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या परिस्थिती पूर्णपणे पोलिसांच्या नियंत्रणात असून गावात शांतता प्रस्थापित झाली असल्याचे पोलीस अधीक्षकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता बाळगावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी केले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.