Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

दारू पिऊन मोठा आवाज करणे गुन्हा ठरू शकत नाही; मुंबई उच्च न्यायालयाचं महत्त्वाचे निरीक्षण

दारू पिऊन मोठा आवाज करणे गुन्हा ठरू शकत नाही; मुंबई उच्च न्यायालयाचं महत्त्वाचे निरीक्षण

मुंबई : खरा पंचनामा 

सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालण्याबाबत हाय कोर्टाने एका प्रकरणात मोठा निर्णय दिला आहे. दारूच्या नशेत दोन व्यक्तींनी एकमेकांवर मोठ्याने ओरडणे, एवढ्याच कारणावरून त्यांच्याविरोधात दखलपात्र गुन्हा दाखल करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. केवळ आवाज मोठा असणे म्हणजे अश्लीलता किंवा समाजाला त्रासदायक वर्तन ठरत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

पिंपरी पोलीस ठाण्यात दोन तरुणांविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा, १९४९ मधील कलम ८५ (१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन्ही तरुण मद्यधुंद अवस्थेत सार्वजनिक रस्त्यावर एकमेकांवर मोठ्याने ओरडत होते आणि त्यामुळे सार्वजनिक शांतता भंग होत असल्याचा आरोप पोलिसांनी केला होता. यातील एक तरुण कायद्याचे शिक्षण घेत असल्याची माहितीही न्यायालयासमोर आली.

या कारवाईला दोन्ही तरुणांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या एकलपीठासमोर सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने स्पष्ट केले की, केवळ दारूचे सेवन करणे हे महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम ८५ अंतर्गत आपोआप गुन्हा ठरत नाही. संबंधित व्यक्तीचे वर्तन समाजाला त्रासदायक, अनुशासनभंग करणारे किंवा सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा आणणारे असल्याचे ठोसपणे दिसणे आवश्यक आहे.

न्यायालयाने पुढे नमूद केले की, केवळ आवाजाची पातळी मोठी आहे म्हणून त्या वर्तनाला अश्लीलता किंवा सभ्यतेचा भंग म्हणता येणार नाही. त्यामुळे उपलब्ध आरोपांच्या आधारे या प्रकरणात गुन्हा योग्य ठरणार नाही, असा निष्कर्ष न्यायालयाने काढला. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ५२८ अंतर्गत न्यायालयाने आपल्या अधिकाराचा वापर करत दोन्ही तरुणांविरोधातील फौजदारी कारवाई रद्द केली. त्यामुळे संबंधित तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मात्र, प्रकरणाचा पूर्णपणे विनाअट निकाल न लावता न्यायालयाने दोन्ही याचिकाकर्त्यांना प्रत्येकी १० हजार रुपये मालेगाव येथील 'आनंद मंगल बहुउद्देशीय संस्था' या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेकडे दंडाच्या स्वरूपात जमा करण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे मद्यधुंद अवस्थेतील प्रत्येक प्रकारचे वर्तन गुन्हा ठरत नाही, तर त्या व्यक्तीच्या प्रत्यक्ष वर्तनाचा समाजावर होणारा परिणाम आणि कायद्यातील आवश्यक घटक महत्त्वाचे ठरतात, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.