Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

रेकॉर्डवरील आरोपीच्या मुलाच्या वाढदिवसाला पोलिसांची 'हजेरी'; तिघे निलंबित

रेकॉर्डवरील आरोपीच्या मुलाच्या वाढदिवसाला पोलिसांची 'हजेरी'; तिघे निलंबित 

पुणे : खरा पंचनामा 

रेकॉर्डवरील आरोपीच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी होणे पुणे शहर पोलिस दलातील तीन अंमलदारांना चांगलेच महागात पडले आहे. पार्टीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर झालेल्या चौकशीत तिघांची उपस्थिती समोर आली.

या प्रकरणी अपर पोलिस आयुक्त संजय पाटील यांनी फरासखाना पोलिस ठाणे आणि वाहतूक शाखेतील तीन पोलिस अंमलदारांना निलंबित केले.

शुभम विजय सुर्वे (फरासखाना पोलिस ठाणे), योगेश भागचंद एकशिंगे आणि अभिजित अनिल शिंदे (दोघे वाहतूक शाखा) अशी निलंबित पोलिसांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीटा कायद्यान्वये दाखल गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपीच्या मुलाचा २ जुलै २०२६ रोजी वाढदिवस होता. त्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत शुभम सुर्वे, योगेश एकशिंगे आणि अभिजित शिंदे सहभागी झाले होते. या पार्टीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिस दलात खळबळ उडाली.

या प्रकाराची चौकशी करून परिमंडळ १ चे पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी अहवाल अपर पोलिस आयुक्तांकडे सादर केला. रेकॉर्डवरील आरोपीच्या कुटुंबीयांच्या कार्यक्रमाला पोलिसांनी उपस्थित राहणे हे पोलिस दलाच्या शिस्तीला धरून नसल्याचे चौकशीत स्पष्ट झाले.

तिघांचे वर्तन बेशिस्त व बेजबाबदारपणाचे असून, त्यामुळे शिस्तप्रिय पोलिस दलाची प्रतिमा जनमानसात मलिन होत असल्याचे निलंबन आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार तिघांना निलंबित करण्याचा आदेश अपर पोलिस आयुक्त संजय पाटील यांनी दिला.

निलंबनाच्या कालावधीत तिघांना शासकीय सेवेतून निलंबित राहावे लागणार असून, त्यांना पोलिस आयुक्तांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. तसेच शिवाजीनगर येथील राखीव पोलिस निरीक्षक, पोलिस मुख्यालय येथे दररोज हजेरी लावण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

रेकॉर्डवरील आरोपीच्या मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने पोलिसांवर निलंबनाची कारवाई झाल्याने पोलिस दलात हा प्रकार चर्चेचा विषय ठरला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोलिसांच्या खासगी कार्यक्रमातील सहभागाच्या व्हिडिओंवरही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.