दिलीप वळसे पाटील यांच्या एका वाक्याने राजकीय चर्चेला उधाण; पवारांची साथ सोडण्यामागचे कारण अखेर समोर
मुंबई : खरा पंचनामा
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अनेक नेत्यांनी पक्ष बदलण्यामागे विकासकामे आणि मतदारसंघाच्या हिताचे कारण पुढे केले. मात्र, शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि निष्ठावंत सहकारी म्हणून ओळखले जाणारे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपण पवारांची साथ का सोडली, यामागचे कारण स्पष्ट केले आहे. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीतील फुटीच्या राजकारणाची चर्चा रंगली आहे.
दिलीप वळसे पाटील यांच्या राजकीय भूमिकेमागे आंबेगाव परिसरातील डिंभे धरणाशी संबंधित प्रश्न महत्त्वाचा असल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे. डिंभे धरणातून माणिकडोहपर्यंत प्रस्तावित असलेल्या सुमारे १६ किलोमीटरच्या बोगद्याला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध आहे. या बोगद्यामुळे आंबेगाव, जुन्नर, शिरूर आणि पारनेर परिसरातील शेतीच्या पाण्यावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
या प्रश्नावरून परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. प्रस्तावित बोगदा झाल्यास भविष्यात शेतीसाठी उपलब्ध असलेल्या पाण्यावर परिणाम होऊ शकतो, अशी भूमिका वळसे पाटील यांनीही मांडली आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा निर्णय केवळ एका मतदारसंघापुरता मर्यादित नसून, अनेक भागांतील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या काळात या प्रश्नावर झालेल्या चर्चेचाही वळसे पाटील यांनी उल्लेख केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि स्वतः वळसे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. या बैठकीत डिंभे-माणिकडोह बोगद्याबाबत महत्त्वाचे आश्वासन देण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे.
दरम्यान, या प्रश्नावर अंतिम निर्णय होण्यापूर्वी मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन पुन्हा चर्चा करण्याची भूमिका वळसे पाटील यांनी मांडली आहे. वरिष्ठ पातळीवर या विषयावर काय निर्णय घेतला जातो, त्यानंतर आपली पुढील भूमिका निश्चित करू, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे वळसे पाटील यांच्या भूमिकेकडे आता महायुतीतील तसेच आंबेगाव-जुन्नर परिसरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
मात्र, या संपूर्ण राजकीय घडामोडींमध्ये सर्वाधिक चर्चेत आलेले विधान खुद्द दिलीप वळसे पाटील यांनीच केले आहे. "डिंभे धरणातून निघणारा बोगदा रद्द करण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता. केवळ आणि केवळ त्या एका शब्दासाठी मी साहेबांची साथ सोडली," असा थेट खुलासा त्यांनी केला. शेतकऱ्यांचे पाणी वाचावे आणि डिंभे-माणिकडोह बोगदा रद्द शेतकऱ्यांचे पाणी वाचावे आणि डिंभे-माणिकडोह बोगदा रद्द व्हावा, या आश्वासनासाठीच आपण शरद पवार यांच्यापासून दूर होऊन अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे वळसे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.