Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कृष्णराज महाडिक युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष धनंजय महाडिकांकडून पदाचा उल्लेख करताना गफलत

कृष्णराज महाडिक युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष 
धनंजय महाडिकांकडून पदाचा उल्लेख करताना गफलत 

कोल्हापूर : खरा पंचनामा 

मनसेच्या विरोधात आंदोलन केल्यानंतर भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष कृष्णराज महाडिक आणि मनसेमध्ये वाक्ययुद्ध सुरू आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही कृष्णराज महाडिक यांना सल्ला दिला आहे. दोन्ही गटांमधील हा वाद चर्चेत असतानाच कृष्णराज महाडिक यांचे वडील आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्या भाषणातील एका वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे.

कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकात धनंजय महाडिक युवाशक्तीच्या वतीने दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरच्या जनतेने महाडिक कुटुंबाला भरभरून दिल्याचे सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृष्णराज महाडिक यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवल्याचे सांगताना त्यांच्या पदाचा उल्लेख केला.

"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतकी मोठी जबाबदारी कृष्णराज महाडिकवर सोपवली आहे. त्यांनी कृष्णराजला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष करून टाकले आहे. त्याच्यावर विश्वास ठेवून जबाबदारी दिली," असे धनंजय महाडिक म्हणाले.

कृष्णराज महाडिक हे भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे भाषणादरम्यान त्यांच्या पदाचा उल्लेख करताना धनंजय महाडिक यांच्याकडून गफलत झाल्याचे दिसून आले. भाषणानंतर ही बाब लक्षात आल्यानंतर संबंधित व्हिडिओ समाजमाध्यमांवरून हटवण्यात आल्याची माहिती आहे.

याच कार्यक्रमातून धनंजय महाडिक यांनी गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीबाबतही भूमिका मांडली. महायुती म्हणून ही निवडणूक लढवली जाणार असून '२५-०' असा निकाल लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.