Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आटपाडीत वृद्धेसह तिच्या मुलावर चाकूने हल्ला करून दागिने लांबवणारे ३ आरोपी सांगली एलसीबीच्या जाळ्यात; ६० हजारांचा मुद्देमाल जप्त

आटपाडीत वृद्धेसह तिच्या मुलावर चाकूने हल्ला करून दागिने लांबवणारे ३ आरोपी सांगली एलसीबीच्या जाळ्यात; ६० हजारांचा मुद्देमाल जप्त

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

आटपाडी तालुक्यातील पळसखेल येथील कुचकरवस्तीत एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून तसेच तिच्या मुलावर चाकूने हल्ला करून पसार झालेल्या तीन आरोपींना सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) जेरबंद केले आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून सुमारे ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मणी जप्त केले असून पुढील तपासासाठी आरोपींना आटपाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.ही घटना १८ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली होती.

 पळसखेल येथील रहिवासी द्वारकाबाई साहेबराव कुचेकर या आपल्या राहत्या घरासमोर असताना कानटोपी आणि जॅकेट परिधान केलेल्या तीन अज्ञात भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची माळ जबरदस्तीने हिसकावून घेतली. द्वारकाबाई यांनी आरडाओरडा केल्यानंतर त्यांचा मुलगा भारत साहेबराव कुचेकर याने आरोपींना विरोध केला. यावेळी आरोपींनी घरात घुसून भारत यांच्यावर चाकूने वार करून जखमी केले व मोटरसायकलवरून पळ काढला. या घटनेबाबत आटपाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे व सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले. घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध नसल्याने पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या माहितीवरून तपास सुरू केला.

तपासादरम्यान २१ सप्टेंबर २०२६ रोजी पथकाला बातमीदाराकडून बातमी मिळाली की, गुन्ह्यातील संशयित आरोपी आटपाडी ते दिघंची रस्त्यावरील कारखानापाटी येथील ए. जे. हॉटेलसमोर थांबले आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे एलसीबी पथकाने तात्काळ सापळा रचून तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी विचारपूस केली असता त्यांनी आपली नावे सोमनाथ मल्हारी चव्हाण (वय २३), राजू प्रल्हाद काळेल (वय ३१) आणि महादेव उर्फ प्रसाद श्रीकांत बुधावले (वय १९, सर्व रा. वरकुटे, मलवडी, ता. माण, जि. सातारा) अशी सांगितली. संशयितांची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता आरोपी सोमनाथ चव्हाण याच्या खिशातील प्लास्टिक पिशवीत ४.४०० ग्रॅम वजनाचे ४९ सोन्याचे लहान मणी (किंमत सुमारे ६०,००० रुपये) मिळून आले. अधिक चौकशी केली असता आरोपींनी कुचकरवस्ती येथे वृद्धेची सोन्याची माळ हिसकावून तिच्या मुलावर चाकूने वार केल्याची कबुली दिली.

ही कारवाई पोलीस निरीक्षक संजीव झाडे, स.पो.नि. प्रशांत निशाणदार, सपोफौ संजय पाटील, सूर्यकांत साळुंखे, अतुल माने, सोमनाथ गुंडे, हणमंत लोहार, संदीप नलावडे, सुनील जाधव, अभिजीत ठाणेकर, प्रमोद स्त्राखरपे, ऋतुराज होळकर, सुमित सूर्यवंशी तसेच सायबर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. जप्त केलेल्या मुद्देमालासह तिन्ही आरोपींना पुढील तपासासाठी आटपाडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.