कवठेमहांकाळ येथील सदाशिव चौगुले खून प्रकरणी नेर्लेतील दोघांना जन्मठेपेची शिक्षा
साक्षीदार फितूर होऊनही वैद्यकीय व तांत्रिक पुराव्यांमुळे कडक कारवाई
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकुड (एस) येथील सदाशिव जगन्नाथ चौगुले यांच्या निर्घृण खून प्रकरणात सांगलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपींना जन्मठेपेची आणि प्रत्येकी ५,००० रुपये दंडाची कडक शिक्षा सुनावली आहे.
सांगलीचे जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. २ श्री एस. एम. चंदगडे यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. सौरभ विकास शिद (वय २१) आणि श्रीकांत चंद्रकांत पाटील (वय २०, दोघे रा. नेर्ले, ता. वाळवा, जि. सांगली) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. घटना १० ऑगस्ट २०२२ रोजी संध्याकाळी ६ ते ६:३० च्या दरम्यान अलकुड (एस) येथे घडली होती. मयत सदाशिव चौगुले आरोपींच्या घरी जाऊन त्यांना धमकी देत होता, तसेच आरोपींच्या मनात सदाशिव याने वाघजाई मंदिरात चोरी केल्याचा राग होता. या रागातून आरोपींनी संगनमताने कट रचून सदाशिव यांच्यावर धारदार हत्याराने वार केले व डोक्यात दगड घालून त्यांचा निर्घृण खून केला. या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास तात्कालीन पोलीस उपनिरीक्षक अक्षयकुमार ठिकणे यांनी पोलीस शिपायी विनोद चव्हाण यांच्या मदतीने अत्यंत गतीने केला. तपासादरम्यान पोलिसांनी ३० हून अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदवले, प्रत्यक्ष घटनास्थळाचे पंचनामे केले, सीसीटीव्ही फुटेज मिळवले व गुन्ह्यात वापरलेली हत्यारे जप्त करून ती न्यायवैद्यकीय विश्लेषणासाठी पाठवली. या प्रकरणात वैद्यकीय अधिकारी, तपास अधिकारी आणि न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या तज्ज्ञ श्रीमती कोरवी यांची साक्ष अत्यंत निर्णायक ठरली.
न्यायालयात सुनावणीदरम्यान फिर्यादी आणि मयताच्या जवळच्या नातेवाईकांसह अनेक महत्त्वाचे साक्षीदार फितूर (होस्टाईल) झाले. परंतु, पोलीस तपासाची गुणवत्ता, वैज्ञानिक अहवाल, सीसीटीव्ही फुटेज आणि वैद्यकीय पुराव्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरला. सरकारी पक्षातर्फे ॲड. विनायक मधुकर देशपांडे यांनी काम पाहिले, तर त्यांना पोलीस अंमलदार नितीन गायकवाड (ब.नं. १३८२) आणि वैभव काळे (ब.नं. १९५) यांनी सहकार्य केले.
साक्षीदारांवर दबाव आणून त्यांना फितूर केले तरीही न्यायदेवतेच्या नजरेतून गुन्हेगार सुटू शकत नाहीत, हे या निकालावरून स्पष्ट झाले आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना भा.दं.वि. कलम ३०२ अन्वये जन्मठेपेची शिक्षा आणि ५,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आरोपींना अतिरिक्त १ महिना साध्या कैदेची शिक्षा भोगावी लागणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.