सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी रावसाहेब पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
सांगली : खरा पंचनामा
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कालावधीसाठी होणाऱ्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीत नागरी सहकारी पतसंस्था मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या वतीने ज्येष्ठ नेते तथा कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
जिल्ह्यातील नागरी सहकारी पतसंस्थांना अधिक सक्षम आणि गतिमान नेतृत्व मिळवून देणे, तसेच पतसंस्था आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्यातील परस्पर समन्वय वाढवून सर्वसामान्य नागरिकांना अधिक प्रभावीपणे पतपुरवठा व विविध सेवा उपलब्ध करून देणे, या मुख्य उद्देशाने आपण निवडणूक रिंगणात उतरलो असल्याचे रावसाहेब पाटील यांनी सांगितले. या मतदारसंघातून आपल्या उमेदवारीला पतसंस्था क्षेत्रातून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुरेशभाऊ खाडे, आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि पक्षनेते शेखर इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवली जाणार असल्याचे सांगत पक्षाने विश्वासाने सोपवलेली जबाबदारी आपण समर्थपणे पार पाडू, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
पक्षाने उमेदवारी कायम ठेवल्यास सर्व सहकारी आणि घटकांना सोबत घेऊन संपूर्ण ताकदीने निवडणूक लढवून विजय मिळवण्यासाठी कटिबद्ध राहू, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
अर्ज दाखल करताना सहकार व राजकीय क्षेत्रातील अनेक प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यामध्ये काकासाहेब धामणे, सुहास पाटील (बोलवाड), दिलीप कांबळे, श्रेणिक पाटील, प्रकाश पाटील (वसगडे), प्रमोद शेटे, पै. धीरज कांबळे, बापू शेटे, इंद्रजीत पाटील, अभिजीत पाटील (ब्रह्मनाळ) आणि विपुल पाटील यांच्यासह कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.