माधुरी पोहोचली कोल्हापुरात, नांदणीकरांनी गुलाल उधळून केलं स्वागत, 'वनतारा'चे मानले आभार
कोल्हापूर : खरा पंचनामा
काही महिन्यांपूर्वी आमची माधुरी आम्हाला आणून द्या, अशी मागणी करणाऱ्या कोल्हापूरकरांची लाडकी माधुरी आता कोल्हापुरात दाखल होत आहे. माधुरी हत्तीण पुन्हा नांदणीत परतली आहे.
वनतारा रेस्क्यू सेंटरने माधुरीची देखभाल केल्यानंतर तिला आता तिच्या घरी आणून सोडलं आहे. गुजरात ते कोल्हापूर असा प्रवास करत माधुरी आता रात्री नांदनीत दाखल झाली. तेव्हा कोल्हापूर करांनी गुलाल उधळून तिचं स्वागत केलं. अनेक ठिकाणी वनतारा सेंटरचे संस्थापक अनंत अंबानी यांचे आभार माणणारे पोस्टरही झळकले.
वनतारा मधून कायदेशीर कागदोपत्री सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूरला प्रवास सुरू झाला. मागील ४८ तासांपासून तिचा प्रवास सुरू होता. मुंबई, पुणे प्रवास करत ती रात्री कोल्हापुरात दाखल झाली आणि गावकऱ्यांचा एकच जल्लोष सुरू झाला. माधुरी हत्तिणीच्या स्वागतासाठी नांदणीवासीय सज्ज झाले. गावात पोस्टर उभारून स्वागत करण्यात येत आहे, तर संध्याकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली.. वनताराच्या सहकार्याने माधुरी परत येत असून वनताराचे आभार गावकऱ्यांनी मानले आहेत.
नांदणी मठाची माधुरी हत्ती पुन्हा रात्री उशिरा परतली आहे. वनतारा रेस्क्यू सेंटरने माधुरीसाठी खास पुनर्वसन केंद्र नांदणीमध्ये उभारलं आहे. तर लोकभावनेचा आदर करून कोर्टाने निर्णय देताच माधुरी परत देण्याचा शब्द वनताराने दिला होता, तो तत्वता पाळला असून आम्ही इथे मिनी वनतारा उभारले आहे, अशा शब्दांत राजू शेट्टी यांनी वनताराचं कौतुक केलं आहे.
कोल्हापूरकरांसाठी केवळ एक हत्तीण नाही, तर गेल्या अनेक वर्षांपासून जपलेलं एक भावनिक नातं. नांदणीच्या मठात वाढलेली माधुरी गुजरातमधील वनतारामध्ये गेल्यानंतर तिच्या परतीची मागणी सातत्याने होत होती. माधुरी पुन्हा नांदणीत यावी, ही लोकभावना दिवसेंदिवस अधिक तीव्र होत गेली आणि अखेर माधुरीच्या घरवापसीचा मार्ग मोकळा झाला. मात्र याच काळात वनताराकडूनही एक वेगळी भूमिका समोर आली. माधुरीला पुन्हा दूर नेण्याऐवजी, तिच्या लोकभावनेचा आणि नांदणीशी असलेल्या भावनिक नात्याचा सन्मान करत, तिची अत्याधुनिक पद्धतीने देखभाल नांदणीतच करता यावी, यासाठी नांदणीमध्येच पुनर्वसन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला. वनताराच्या या प्रस्तावामागे एक महत्त्वाचा विचार होता... माधुरी जिथे भावनिकदृष्ट्या जोडलेली आहे, तिथेच राहावी; पण तिच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ नये.
म्हणूनच माधुरीच्या उपचारांसाठी आवश्यक असलेल्या आधुनिक सुविधा नांदणीमध्येच उपलब्ध करून देण्याचा विचार करण्यात आला. यासाठी वनताराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोल्हापुरात येऊन परिस्थितीची पाहणी केली आणि माधुरीसाठी आवश्यक असलेल्या सुविधा नांदणीमध्ये कशा उभारता येतील, याचा आराखडा तयार करण्यात आला. या प्रस्तावित केंद्रामध्ये माधुरीला मोकळ्या वातावरणात फिरता यावं, तिच्या पायांवर आणि सांध्यांवर ताण कमी व्हावा, यासाठी मऊ वाळूची व्यवस्था, विशेष फ्लोअरिंग, पाण्यात व्यायामासाठी जलाशय आणि आवश्यक वैद्यकीय सुविधा देण्याचा विचार करण्यात आला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.