Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवा आणि नियमांचे काटेकोर पालन करा मिरजेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटी व गणेश मंडळांची बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन शर्मा यांचे आवाहन

सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवा आणि नियमांचे काटेकोर पालन करा 
मिरजेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटी व गणेश मंडळांची बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन शर्मा यांचे आवाहन 

पूजा फडके 
मिरज : खरा पंचनामा 

मिरज येथील पटवर्धन हॉलमध्ये आगामी गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटी, गणेश मंडळांचे पदाधिकारी, नगरसेवक तसेच राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती. 

बैठकीत गणेशोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच इतर विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मिरवणुकीत डीजे वापरास परवानगी देण्याची मागणी लावून धरली, तर दुसरीकडे विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी डीजेच्या आवाजावर कडक नियंत्रण आणण्याची आग्रही मागणी केली.

बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी सर्व गणेश मंडळांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपापल्या मंडप परिसरात तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक असल्याचे सांगितले. तसेच गणेशोत्सवात आयोजित केल्या जाणाऱ्या महाप्रसादासाठी मंडळांना कोणत्याही वेगळ्या शासकीय परवानगीची गरज नाही, मात्र अन्नातून विषबाधा होण्यासारख्या कोणत्याही अनुचित घटना घडणार नाहीत याची पूर्ण खबरदारी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. येणारा गणेशोत्सव सण अत्यंत शांततेत, शिस्तीत आणि उत्साही वातावरणात साजरा करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या महत्त्वपूर्ण बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे, सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस निरीक्षक संजीव झाडे, पोलीस निरीक्षक किरण चौगले, सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह ज्येष्ठ नेते सुरेशबापू आवटी, नगरसेवक निरंजन आवटी, सागर वनखंडे, आतहर नाइकवडी, संजय बापू मेंढे, करण जामदार, संदीप आवटी, मोहन वाटवे, नगरसेविका विद्याताई नलवडे, बिलकिस बुजरूक, माजी नगरसेवक योगेंद्र थोरात, भाजपा नेते फारूक जमादार, डॉ. महेशकुमार कांबळे, शिवाजी दुर्वे, पप्पू कोळेकर, महादेव नलवडे, अशोक कांबळे, विलास देसाई यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी, गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.