लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाची मोर्चेबांधणी; ४० मतदारसंघांत संपर्कप्रमुखांची नियुक्ती
मुंबई : खरा पंचनामा
आगामी २०२९ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने संघटनात्मक बांधणीला वेग दिला आहे. राज्यातील ४८ पैकी तब्बल ४० लोकसभा मतदारसंघांसाठी संपर्कप्रमुखांची नियुक्ती पक्षाने जाहीर केली आहे.
मुंबईतील आमदार, माजी नगरसेवक, पक्षाचे विविध पदाधिकारी तसेच तरुण चेहऱ्यांवरही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाने आतापासूनच मतदारसंघनिहाय तयारी सुरू केल्याचे स्पष्ट होत आहे.
मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांसह ठाणे आणि जळगाव वगळता राज्यातील अनेक मतदारसंघांसाठी संपर्कप्रमुख निश्चित करण्यात आले आहेत. कल्याण-भिवंडीची जबाबदारी वरुण सरदेसाई, तर शिर्डी-अहिल्यानगरसाठी सुनील शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सातारा-सांगलीसाठी नितीन बानुगडे-पाटील, छत्रपती संभाजीनगरसाठी आशीष चेंबुरकर, शिरूरसाठी किरण तावडे आणि पुणे जिल्ह्यासाठी सचिन पडवळ यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.
सोलापूर-माढ्यासाठी सुषमा अंधारे, नाशिक-दिंडोरीसाठी रविंद्र मिर्लेकर, बुलढाण्यासाठी नितीन देशमुख आणि नरेंद्र खेडेकर, अकोल्यासाठी नितीन देशमुख आणि नीलेश घुमाळ, तर अमरावतीसाठी नितीन देशमुख आणि डॉ. किशोर ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हिंगोलीसाठी बबनराव थोरात, कोल्हापूरसाठी अरुण दुधवडकर, बारामतीसाठी संजय सावंत, धुळ्यासाठी अशोक धात्रक, रावेरसाठी गुलाबराव वाघ आणि नंदुरबारसाठी मुकेश साळुंके यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी प्रदीप बोरिकर, रायगडसाठी संजय मानाजी कदम, मावळसाठी प्रसाद भोईर, पालघरसाठी विलास पोतनीस, साताऱ्यासाठी उदय ढळवी, सांगलीसाठी स्वप्नील कुंजीर आणि हातकणंगलेसाठी महेंद्र इंदुलकर यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय जालना, धाराशिव, नांदेड, परभणी, लातूर, बीड, यवतमाळ-वाशिम, वर्धा, नागपूर, रामटेक, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि भंडारा-गोंदिया या मतदारसंघांसाठीही संपर्कप्रमुख निश्चित करण्यात आले आहेत.
२०२९ ची लोकसभा निवडणूक अद्याप दूर असली तरी ठाकरे गटाने संघटनात्मक पातळीवर तयारी सुरू केली आहे. मतदारसंघनिहाय संघटन मजबूत करणे, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढवणे तसेच आगामी राजकीय लढाईसाठी पक्षाची फळी तयार करणे, या उद्देशाने या नियुक्त्या करण्यात आल्याचे दिसून येत आहे.
या संपर्कप्रमुखांवर संबंधित लोकसभा मतदारसंघातील संघटनात्मक कामकाजाला गती देणे, कार्यकर्त्यांशी संवाद वाढवणे आणि पक्षाची स्थानिक पातळीवरील ताकद वाढवण्याची महत्त्वाची जबाबदारी राहणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.