Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

औषध निरीक्षक पेपर फुटीचे धागेदोरे थेट मंत्री कार्यालयापर्यंत? मंत्री नरहरी झिरवाळ यांचे कार्यालय चर्चेत

औषध निरीक्षक पेपर फुटीचे धागेदोरे थेट मंत्री कार्यालयापर्यंत? मंत्री नरहरी झिरवाळ यांचे कार्यालय चर्चेत

मुंबई : खरा पंचनामा 

राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागातील 'औषध निरीक्षक' परिक्षेतील पेपरफुटीप्रकरणामध्ये विचित्र योगायोग समोर आला असून या विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांचे कार्यालय पुन्हा चर्चेत आले आहे. पेपरफुटी प्रकरणातील आरोपीच्या नंदूरबार येथील घरी मंत्री झिरवाळ यांचे विशेष कार्य अधिकारी गणेश देवरे हे भाडेकरु असून पेपर फुटीप्रकरण समोर आल्यापासून ते मंत्री कार्यालयात फिरकलेले नाहीत.

राज्य लोकसेवा आयोगाने (MPSC) औषध निरीक्षक गट- ब पदाची २२ मार्च रोजी चाळणी परीक्षा घेतली होती. मुलाखती होवून २२ जुलै रोजी पात्र ४८८ उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली. त्या परिक्षेतील प्रश्न काही उमेदवारांना मिळाल्याचे आयोगाला काहींनी त्याच दिवशी ई-मेलद्वारे कळवले. २७ जुलै रोजी आयोगाकडून त्या संदर्भात गुन्हा नोंद करण्यात आला. मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेकडून या प्रकरणाचा तपास चालू आहे.

याप्रकरणी आतापर्यंत सात व्यक्तींना अटक झालेली आहे. यामध्ये राज्य लोकसेवा आयोगाचे तीन कर्मचारी असून पाच आरोपी नंदूरबारचे आहेत. आयोगाने सदर भरती प्रक्रिया रद्द केली आहे. या प्रकरणात नंदूरबारच्या कौटील्य अकादमीचे प्रविण पाटील तसेच परीक्षार्थी ऋतुजा पाटील, गौरव पाटील यांनाही अटक झाली आहे. गौरव पाटील यांच्या नंदूरबारच्या घरी मंत्री नरहरी झिरवाळ यांचे विशेष कार्य अधिकारी गणेश देवरे भाडेकरु आहेत.

लोकसेवा आयोग आणि मंत्री कार्यालय यांचा अर्थाअर्थी काही संबंध येत नाही. मंजूर पदांची आवश्यकता संबंधित विभाग राज्य लोकसेवा आयोगास कळवतो आणि आयोगाकडून परीक्षांचे संचलन होते. परंतु, ज्या अन्न व औषध प्रशासन विभागाची ही परीक्षा होती, त्याच विभागाच्या मंत्री कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी गणेश देवरे आरोपींच्या घरी भाडेकरु असल्याने चर्चा सुरु झाल्या आहेत.

गणेश देवरे यांची मूळ आस्थापना कृषी विभाग आहे. झिरवाळ विधानसभा उपाध्यक्ष होते, तेव्हापासून ते त्यांच्याकडे कार्यरत आहेत. चार महिन्यांपूर्वी मंत्री झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपीकास लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. त्यानंतर हा नवा प्रकार समोर आल्याने झिरवाळ यांचे कार्यालय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. झिरवाळ हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री आहेत.

मंत्री कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी गणेश देवरे हे आरोपीच्या घरी भाडेकरु आहे, याची माहिती आमच्याकडे आहे. मात्र अद्याप संबंधितांची पोलीस चौकशी केलेली नाही, असे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई गुन्हे शाखेतील सूत्रांनी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.