Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट, पोलिसांचा लाठीचार्ज अन् मंडळाच्या अध्यक्षाचा मृत्यू

गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट, पोलिसांचा लाठीचार्ज अन् मंडळाच्या अध्यक्षाचा मृत्यू

अहिल्यानगर : खरा पंचनामा 

अहिल्यानगरमधील भिंगार उपनगरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या गोंधळात शुक्लेश्वर तरुण गणेश मंडळाचे अध्यक्ष 45 वर्षीय दीपक वाघस्कर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

या घटनेनंतर स्थानिक कार्यकर्ते आणि पोलिसांनी एकमेकांवर गंभीर आरोप-प्रत्यारोप केले असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी दावा केल आहे की, पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे वाघस्कर यांचा मृत्यू झाला. तर, पोलिसांनी हा दावा फेटाळून लावला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, 23 सप्टेंबर रोजी भिंगार उपनगरात गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान रात्री विसर्जन मिरवणुकीत गुलाल उधळण्यावरून वाद झाला. हा वाद थांबवण्यासाठी लाठीचार्ज करत गर्दी पंगवण्याचा प्रयत्न केला. पण याचदरम्यान दीपक वाघस्कर यांचा मृत्यू झाला असल्याचा दावा करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांनी आरोप केला की, वाद झाल्यानंतर पोलिसांनी अचानक आणि विनाकारण गणेशभक्तांवर लाठीचार्ज केला. पोलिसांनी केलेल्या या लाठीचार्जनंतर झालेल्या पळापळीत किंवा मारहाणीमुळेच इंजिनिअर दीपक वाघस्कर यांचा जीव गेला असल्याचा दावा आमदार संग्राम जगताप यांनी केला आहे. पोलिसांनी लहान मुले, महिला आणि मध्यमवयीनांनाही मारहाण केली. तसेच गणेशभक्तांचे भगवे ध्वज आणि गुलालाच्या गोण्या हिसकावून घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या घटनेनंतर भिंगार शहरातील गणेश विसर्जन मिरवणुका थांबवण्यात आल्या होत्या. उपअधीक्षक दिलीप टिपरसे आणि थोरात यांच्या कारवाईमुळेच लाठीचार्ज झाला, असा आरोप मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होईपर्यंत भिंगार शहर बेमुदत बंद ठेवण्याचा आणि मूर्तीचे विसर्जन न करण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला. यामुळे, आमदार संग्राम जगताप यांनी रात्री दोन वाजेपर्यंत भिंगारमध्ये रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन केले. याच निमित्ताने गुरुवारी (24 सप्टेंबर) भिंगार बंदची हाक देण्यात आली. गुन्हा दाखल होईपर्यंत भिंगार बंद ठेवण्याची कार्यकर्त्यांनी भूमिका घेतली आहे.

अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांची भूमिका स्पष्ट केली. पोलीस अधीक्षकांच्या दाव्यानुसार, विसर्जन मिरवणुकीदरम्यान जेव्हा पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अत्यंत सौम्य बळाचा वापर केला. त्यावेळी, दीपक वाघस्कर हे मूळ घटनास्थळी उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांचा मृत्यू लाठीचार्जमुळे झालेला नाही. मिरवणुकीत एका ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर मोठ्या संख्येने गणेशभक्त चढून नाचत होते. ती ट्रॉली धोकादायक स्थितीत असल्याने उलटून मोठा अपघात होण्याची दाट शक्यता होती. डीजेचा आवाज मोठा असल्याने पोलिसांनी केलेले आवाहन लोकांपर्यंत पोहोचत नव्हते. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी पोलिसांनी तिथे कारवाई केली. दीपक वाघस्कर यांचा मृत्यू लाठीचार्जमुळे झाला की इतर कोणत्याही वैद्यकीय कारणाने हे फक्त वैद्यकीय आणि शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे पोलीस प्रशासनाने सांगितले आहे. सध्या पोलीस प्रशासन परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न करत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.