Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

तांत्रिक कारणावरून विमा दावा नाकारणे ही सेवेत त्रुटी; आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्सला सांगली ग्राहक आयोगाचा दणका

तांत्रिक कारणावरून विमा दावा नाकारणे ही सेवेत त्रुटी; आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्सला सांगली ग्राहक आयोगाचा दणका

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

केवळ उपचार बाह्यरुग्ण (ओपीडी) पद्धतीने करता आले असते, या तांत्रिक कारणावरून वैद्यकीय विमा दावा नाकारणे ही सेवेतील थेट त्रुटी असल्याचे स्पष्ट करत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, सांगली यांनी आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स कंपनीला विमाधारकाचा दावा तात्काळ मंजूर करण्याचे आदेश दिले आहेत. आयोगाने १७ सप्टेंबर २०२६ रोजी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. तक्रारदार संतोष बबन मेखले यांनी स्वतः व आपल्या कुटुंबीयांच्या वैद्यकीय संरक्षणासाठी आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स कंपनीकडून फॅमिली फ्लोटर आरोग्य विमा पॉलिसी घेतली होती.

 दरम्यान, आजारपणामुळे डॉक्टरांच्या स्पष्ट सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले. पाच दिवसांच्या या वैद्यकीय उपचारांचा एकूण खर्च १७,६३६ रुपये झाला. उपचारांनंतर मेखले यांनी हा खर्च मिळण्यासाठी विमा कंपनीकडे दावा सादर केला. मात्र, रुग्णाला रुग्णालयात दाखल करून आंतररुग्ण म्हणून उपचार घेण्याची प्रत्यक्ष आवश्यकता नव्हती आणि हे उपचार बाह्यरुग्ण पद्धतीनेही शक्य होते, असा तांत्रिक दावा करत विमा कंपनीने हा दावा फेटाळून लावला होता.

विमा कंपनीने दावा नाकारल्याने तक्रारदाराने सांगली जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात दाद मागितली. सुनावणी दरम्यान सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांवरून, रुग्णाला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आंतररुग्ण म्हणून दाखल करण्यात आले होते आणि त्यांनी प्रत्यक्ष वैद्यकीय उपचार घेतले असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे केवळ तांत्रिक आक्षेप घेऊन दावा नाकारणे ही विमा कंपनीची सेवेतील त्रुटी असल्याचे आयोगाने अधोरेखित केले.

आयोगाने ही तक्रार अंशतः मंजूर करत आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स कंपनीला १७,६३६ रुपयांचा विमा दावा तक्रार दाखल केलेल्या दि. २५ सप्टेंबर २०२४ पासून वार्षिक ६ टक्के व्याजासह अदा करण्याचे आदेश दिले. याशिवाय, तक्रारदाराला सहन कराव्या लागलेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी १०,००० रुपये आणि तक्रारीच्या खर्चापोटी ८,००० रुपये देण्याचे निर्देशही दिले आहेत. या प्रकरणात तक्रारदारांच्या वतीने ॲड. व्ही. एम. केळकर यांनी कामकाज पाहिले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.