सांगलीत दहीहंडीत मोठ्या आवाजात डीजे वाजवल्याप्रकरणी आयोजकांसह चौघांवर गुन्हा दाखल
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
श्रीकृष्ण जन्माष्टमी, गोपाळकाला आणि आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात डॉल्बी आणि अतिउच्च क्षमतेच्या ध्वनिक्षेपकांवर बंदी घालण्यात आली असताना, नियमांचे उल्लंघन करून मोठ्या आवाजात डीजे वाजवल्याप्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुण भारत स्टेडियम येथे ६ सप्टेंबर रोजी आयोजित दहीहंडी कार्यक्रमादरम्यान पोलीस पथकाने ही कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, साथीदार युथ फाउंडेशनच्या वतीने मुकुंद विश्वास कांबळे यांच्या नेतृत्वाखाली तरुण भारत स्टेडियम येथे दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान मोठ्या आवाजात डॉल्बी सिस्टीम सुरू असल्याने पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील व पथकाने आवाज कमी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, पोलिसांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करत ध्वनिक्षेपक उच्च आवाजात सुरूच ठेवण्यात आले. त्यामुळे आयोजक मुकुंद विश्वास कांबळे (रा. हरीपूर), डॉल्बी सिस्टीमचे मालक चंद्रसेन सव्वाशे (रा. मिरज), ऑपरेटर शांतिनाथ संजय उळागड्डे (रा. म्हैसाळ) आणि जनरेटर मालक अमोल जयसिंग पाटील (रा. सांगलीवाडी) यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
जिल्ह्यात सण-उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती आणि लहान मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने ३ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३ अन्वये डॉल्बी व उच्च क्षमतेच्या साऊंड सिस्टीमच्या वापरावर बंदी घातली आहे. यापूर्वीच संबंधितांना भारतीय न्याय संहिता कलम १६८ अन्वये नोटीस बजावण्यात आली होती. तरीही आदेशाचा भंग केल्याने पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत पुजारी यांच्या फिर्यादीवरून सांगली शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २२३ आणि २९२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार जयवंत येसादे करत असून, ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे आणि सांगली शहरचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.