Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सतीश सालियन यांच्या ५०० कोटींच्या मानहानीच्या नोटिशीला आदित्य ठाकरेंचे उत्तर; माफी मागण्यास नकार

सतीश सालियन यांच्या ५०० कोटींच्या मानहानीच्या नोटिशीला आदित्य ठाकरेंचे उत्तर; माफी मागण्यास नकार

मुंबई : खरा पंचनामा 

शिवसेनेचे (ठाकरे) नेते, आमदार आदित्य ठाकरे यांना दिवंगत दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांनी ५०० कोटी रुपयांची अब्रुनुकसानीची नोटीस दिली होती.

सालियन आणि त्यांच्या वकिलांनी १९ सप्टेंबर रोजी मातोश्रीवर जाऊन नोटीस सुपुर्द केल्यामुळे वाद उद्भवला होता. त्यानंतर आता आदित्य ठाकरे यांनी या नोटिशीला उत्तर दिले असून सतीश सालियन यांची माफी मागण्यास किंवा ५०० कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यास त्यांनी नकार दिला आहे. तसेच त्यांना बजावलेली नोटीस निरर्थक आणि कायदेशीरदृष्ट्या असमर्थनीय असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

हिंदुस्तान टाइम्सने या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलेले आहे. आदित्य ठाकरे यांच्या वतीने वकील अंशुमन सिन्हा यांनी सतीश सालियन यांच्या नोटिशीला २५ पानी उत्तर दिले आहे. दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर असलेल्या दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सीबीआयने एफआयआर दाखल केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर मराठी आणि इंग्रजीमध्ये एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टनंतर सतीश सालियन यांनी ही नोटीस बजावली होती.

आदित्य ठाकरेंच्या वतीने दिलेल्या उत्तरात असे नमूद करण्यात आले आहे की, सोशल मीडियावर लिहिलेल्या इंग्रजी आणि मराठी पोस्टमध्ये सतीश सालियन यांच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे सदर पोस्ट त्यांच्याविरुद्ध बदनामीकारक आरोप ठरू शकत नाही. तसेच दिशा सालियनच्या मृत्यूशी त्यांचा संबंध जोडून दीर्घकाळापासून जे राजकीय आरोप आणि माध्यमातून अपप्रचार होत आहे, त्याला उत्तर म्हणून त्यांनी ही पोस्ट लिहिली होती, असेही आदित्य ठाकरेंच्या उत्तरात नमूद केले आहे.

मुंबई पोलिसांनी सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद केली होती. पोलिसांच्या चौकशीत घातपाताचा कोणताही पुरावा आढळला नव्हता. त्यामुळे सदर मृत्यू आत्महत्या असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. डिसेंबर २०२३ मध्ये या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यात आली. परंतु एप्रिल २०२६ मध्येही पूर्वीचाच निष्कर्ष काढून तपास बंद करण्यात आला.

मात्र सतीश सालियन यांनी घातपाताचा संशय व्यक्त करत या प्रकरणात काही शक्तीशाली लोकांना वाचविले जात असल्याचा आरोप केला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.