Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मुंबई - गोवा हायवेवर वाहतूक कोंडी; गणपती बाप्पाच्या आगमनाआधीच कोकणवासीयांचे हाल !

मुंबई - गोवा हायवेवर वाहतूक कोंडी; गणपती बाप्पाच्या आगमनाआधीच कोकणवासीयांचे हाल !

ठाणे : खरा पंचनामा 

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांची गर्दी आणि सणाच्या खरेदीसाठी बाजारात पडलेल्या नागरिकांच्या वाहनांमुळे ठाणे, नवी मुंबई परिसरासह प्रमुख मार्गावर वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. 

विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी सोडलेल्या मोफत तसेच विशेष गाड्या आणि हजारो खासगी वाहने एकाच वेळी रस्त्यावर आल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. पनवेल जवळील पळस्पे पुलावर अवजड वाहनांमुळे चाके जागच्या जागी रुतली, तर मुंबई-गोवा मार्गावरही तासनतास संथ गतीने वाहने पुढे सरकत असल्याने चाकरमान्यांचा प्रवास अत्यंत त्रासदायक ठरला.

ठाणे आणि नवी मुंबईतील मुख्य मार्गांवर गाड्यांची कोंडी ठाणे परिसरातील पूर्व द्रुतगती महामार्ग, मुंब्रा वळण रस्ता, शिळफाटा-महापे रस्ता, ठाणे-बेलापूर रस्ता आणि खारघर या भागांमध्ये वाहनांची प्रचंड गर्दी उसळली होती. ठाणे ते वाशी हे अवघ्या काही मिनिटांचे अंतर कापण्यासाठी वाहनचालकांना दोन तासांहून अधिक वेळ खर्ची घालावा लागला. बाजारपेठेत खरेदीसाठी उसळलेल्या गर्दीमुळे ठाणे परिवहन सेवेच्या वाहनांनाही कोंडीचा फटका बसला. रेल्वे स्थानक परिसरातील उड्डाणपुलावर प्रवाशांना रिक्षा आणि वाहनांसाठी तब्बल पंचवीस ते तीस मिनिटे ताटकळत उभे राहावे लागले.

यंदा मुंबई महानगरातून कोकणाच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली असून शुक्रवारच्या एकाच रात्री हजारो विशेष आणि खासगी वाहने कोकणाकडे निघाली. गेल्या वर्षाच्या तुलनेत खासगी वाहनांच्या संख्येत पंधरा टक्क्यांची मोठी वाढ नोंदवली गेली आहे. महामंडळाने जाहीर केलेल्या हजारो जादा गाड्या पूर्ण क्षमतेने भरून धावत असून बहुतांश गाड्या आधीच आरक्षित झाल्या होत्या. यामुळे रस्त्यांवर वाहनांचा ताण कमालीचा वाढल्याचे दिसून आले.

मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव आणि इंदापूर भागात वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. अवघे पाच ते सहा किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी प्रवाशांना एक तासाहून अधिक कालावधी लागत होता. सणाच्या काळात अवजड मालवाहू गाड्यांवर निर्बंध असतानाही रस्त्यांवर मालमोटारी आणि रासायनिक टँकर आल्यामुळे वाहतुकीची समस्या अधिकच चिघळली आणि चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.