Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मिरज तालुक्यातील खंडेराजुरी येथील घरफोडीचा छडापुतण्याकडूनच १ लाख ३१ हजार रुपयांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी, मिरज ग्रामीण पोलिसांची कारवाई

मिरज तालुक्यातील खंडेराजुरी येथील घरफोडीचा छडा
पुतण्याकडूनच १ लाख ३१ हजार रुपयांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी, मिरज ग्रामीण पोलिसांची कारवाई

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

मिरज तालुक्यातील खंडेराजुरी येथील पायाप्पाचीवाडी रोड परिसरातील घरफोडीचा छडा लावण्यात मिरज ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून चोरीला गेलेला १ लाख ३१ हजार रुपये किमतीचा २१ ग्रॅम वजनाचा संपूर्ण सोन्या-चांदीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दीपक गणपती पाटील (वय ३४, रा. ओमनगर, बेडग-नरवाड रोड, गोवरदेवीवाडी, ता. मिरज, जि. सांगली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

घटनाक्रमाची सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी हरिश्चंद्र बळवंत पाटील (वय ५५, रा. खंडेराजुरी) यांच्या पत्नी सौ. मंगल पाटील यांनी २४ सप्टेंबर २०२६ रोजी घरातील कपाटात सोन्या-चांदीचे दागिने असलेली पर्स ठेवली होती. २४ ते २५ सप्टेंबरदरम्यान हरिश्चंद्र पाटील शेतात आणि त्यांच्या पत्नी जनावरांच्या गोठ्यात गेल्या होत्या. घर रिकामे असल्याचे पाहून भेट देण्यासाठी आलेला त्यांचा पुतण्या दीपक पाटील याने कपाटातील पर्समधून सोन्याचे व चांदीचे दागिने चोरून खिशात घातले व तिथून काढता पाय घेतला. घरातील दागिने चोरीला गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हरिश्चंद्र पाटील यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

गुन्ह्याचा तपास जलद गतीने करण्यासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील यांनी पथक तयार केले. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार हेमंत ओमासे, शशिकांत जाधव आणि विकास भोसले यांनी घटनास्थळाची पाहणी करून व गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळवून संशयित दीपक पाटील याला बेडग ते नरवाड रोडवर सापळा रचून ताब्यात घेतले.

सुरवातीला पोलिसांना खोटी माहिती देणाऱ्या दीपकची पोलिसी खाक्या दाखवून कडक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी दोन पंचांसमक्ष त्याच्याकडून ६२ हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र, ३० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण, २४ हजार रुपयांचे कानातील सोन्याचे टॉप्स, ४ हजार रुपयांचे चांदीचे पैंजण आणि १ हजार रुपयांच्या चांदीच्या मासोळ्या असा एकूण १,३१,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार पुढील कायदेशीर तपास करत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.