Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आरगमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ९ गणेशोत्सव मंडळांवर मिरज ग्रामीण पोलिसांची धडक कारवाईध्वनिप्रदूषणप्रकरणी अध्यक्ष व डी.जे. मालकांवर गुन्हे दाखल

आरगमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ९ गणेशोत्सव मंडळांवर मिरज ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई
ध्वनिप्रदूषणप्रकरणी अध्यक्ष व डी.जे. मालकांवर गुन्हे दाखल

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

गणेशोत्सवातील नियमांचे उल्लंघन करून मोठ्या आवाजात डी.जे. सिस्टिम वाजवल्याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरग येथील ९ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. १७ सप्टेंबर २०२६ रोजी पार पडलेल्या ५ दिवसांच्या गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदेशीर मर्यादा ओलांडून प्रचंड ध्वनिप्रदूषण केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली असून, संबंधित मंडळांचे अध्यक्ष व डी.जे. सिस्टिम मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे आणि पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील यांनी ध्वनिप्रदूषणाचे नियम पाळण्याचे आणि डी.जे. स्पीकर वापरताना एक बेस व एक टॉप या मर्यादेचे तंतोतंत पालन करण्याचे स्पष्ट आवाहन केले होते. मात्र, या आवाहनाचे उल्लंघन करून आरग येथील ५ दिवसांच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत ९ मंडळांनी ४ बेस व २ टॉप अशा मोठ्या क्षमतेच्या डी.जे. सिस्टिमचा वापर केला. या कर्कश आवाजामुळे लहान मुले, महिला व वृद्ध नागरिकांना गंभीर त्रासाला सामोरे जावे लागले.

नागरिकांना होणाऱ्या त्रासाची तात्काळ दखल घेत मिरज ग्रामीण पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन डेसिबल मीटरद्वारे आवाजाची अधिकृत मोजणी केली. या मोजणीत ध्वनीची तीव्रता कायदेशीर मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी बिरदेव तरुण मंडळ, सत्यप्रेमी गणेशोत्सव मंडळ, हिंदवी गणेशोत्सव मंडळ, श्री गणेश मंडळ आरग, नवज्योत गणेशोत्सव मंडळ, वीर गर्जना गणेशोत्सव मंडळ, नवरत्न गणेशोत्सव मंडळ, एकता गणेशोत्सव मंडळ आणि तरुण मित्र मंडळ या ९ मंडळांच्या अध्यक्षांसह त्यांच्याशी संबंधित डी.जे. व साऊंड सिस्टिम मालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार उत्सव हा आनंदाचा, संस्कृतीचा व उत्साहाचा असावा; त्यामुळे मर्यादेपेक्षा जास्त आवाजात डी.जे. वाजवून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणे गैर आहे. रात्री १०.०० वाजेनंतर अथवा न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन करून साऊंड सिस्टिम वाजवल्यास डेसिबल मीटरद्वारे तपासणी करून पुढील काळातही गुन्हे दाखल केले जातील आणि साहित्य जप्त केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील आणि मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने केली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.