Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आटपाडी येथील पोक्सो आणि बलात्कार प्रकरणातील ७० वर्षीय आरोपीला जन्मठेपविटा न्यायालयाचा निर्णय

आटपाडी येथील पोक्सो आणि बलात्कार प्रकरणातील ७० वर्षीय आरोपीला जन्मठेप
विटा न्यायालयाचा निर्णय

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

सांगली जिल्ह्यातील आटपाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या अल्पवयीन बालिकांवरील लैंगिक अत्याचार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्ह्यात विटा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. सप्टेंबर २०१७ मध्ये आटपाडी तालुक्यातील गळवेवाडी (काळेलवस्ती) येथे ७० वर्षीय आरोपी शिवाजी कोंडीबा काळेल याने दोन लहान मुलींना चॉकलेटचे आमिष दाखवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले होते.

याप्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर, विटा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. आर. भागवत यांनी आरोपी शिवाजी काळेल याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय आरोपीला ३,४०,००० रुपये द्रव्यदंड ठोठावण्यात आला असून, दंड न भरल्यास अतिरिक्त १५ महिन्यांची साधी कैद भोगेची तरतूद करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन साहाय्यक पोलीस निरीक्षक सुधारक देडे यांनी तत्कालीन पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

खटल्यादरम्यान सरकारी वकील आरती महानंद देशपांडे-साटविलकर यांनी भक्कम बाजू मांडत एकूण १० साक्षीदारांची साक्ष नोंदवली. यामध्ये ग्रामीण रुग्णालय आटपाडी व नागरी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका आणि पीडित बालिकांची साक्ष अत्यंत निर्णायक ठरली.

छत्तीसगडहून आलेल्या फिर्यादी आणि पीडितांना योग्य पोलीस संरक्षण देऊन त्यांची न्यायालयात व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे व प्रत्यक्ष साक्ष नोंदवून घेण्यासाठी आटपाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पवार आणि कोर्ट पैरवी अंमलदार लक्ष्मण गुरव यांनी विशेष प्रयत्न केले. सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर व उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक, कोर्ट मॉनिटरिंग सेल आणि पैरवी अंमलदारांच्या योग्य पाठपुराव्यामुळे आरोपीला कठोर शिक्षा मिळवून देण्यात यश आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.