Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

८ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार व खून करणाऱ्या ७० वर्षीय आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षाविटा न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

८ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार व खून करणाऱ्या ७० वर्षीय आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा
विटा न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील गळवेवाडी येथील अवघ्या आठ वर्षांच्या अल्पवयीन चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या ७० वर्षीय आरोपी शिवाजी कोंडीबा काळेल याला विटा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा आणि ३ लाख ८० हजार रुपयांचा द्रव्यदंड सुनावला आहे. दंड न भरल्यास आरोपीला १५ महिन्यांचा अतिरिक्त साधा कारावास भोगावा लागेल. विटा न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. भागवत यांनी हा निकाल दिला असून सांगली जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत न्यायालयाने सुनावलेली ही तिसरी फाशीची शिक्षा आहे.

ही दुर्दैवी घटना ७ जानेवारी २०१८ रोजी घडली होती. पीडित चिमुरडी घरासमोर एकटी खेळत असताना आरोपी शिवाजी काळेल याने तिला आमिष दाखवून घरात बोलावून घेतले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर गळा आवळून तिचा खून केला व पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तिचा मृतदेह काळेलवस्ती येथील जगमाईच्या पडक्या कोरड्या विहिरीत फेकून दिला. ८ जानेवारी २०१८ रोजी विहिरीमध्ये मुलीचा मृतदेह गळ्याला लेगीजने गाठ बांधलेल्या अवस्थेत आढळून आला होता. अर्जुन ईश्वरा काळेल यांच्या फिर्यादीवरून आटपाडी पोलीस ठाण्यात सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, परंतु मृतदेह सापडल्यानंतर हत्येचे व पोक्सो कायद्यांतर्गत कलमे समाविष्ट करण्यात आली.

तत्कालीन तपासी अधिकारी व पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरवून २६ जुलै २०१८ रोजी आरोपी शिवाजी काळेल यास अटक केली. तपासात आरोपीविरुद्ध सबळ पुरावे निष्पन्न झाल्यानंतर विटा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या खटल्यात सरकारी वकील आरती महानंद देशपांडे-सातविलकर यांनी अत्यंत प्रभावीपणे बाजू मांडली. न्यायालयाने फिर्यादी, वैद्यकीय अधिकारी, फॉरेन्सिक तज्ज्ञ, नार्को टेस्ट व ब्रेन मॅपिंग अधिकारी यांच्यासह एकूण १९ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवून घेतल्या.

या खटल्यातील काही अत्यंत महत्त्वाचे साक्षीदार छत्तीसगड येथील रहिवासी होते. आटपाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पवार यांनी त्या साक्षीदारांना सुरक्षितपणे छत्तीसगडवरून आणून त्यांची साक्ष नोंदवून सुरक्षित परत पोहचवण्याची महत्त्वाची भूमिका बजावली. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली आटपाडी पोलिसांच्या पथकाने केलेल्या उत्कृष्ट तपासाच्या व कोर्ट पैरवीच्या जोरावर नराधम आरोपीला कठोर शिक्षा मिळवून देण्यात यश आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.