'साहेब, सगळं गेलं.. जगायचं कसं? आता तुम्हीच आम्हाला..', शेतकऱ्यांचा CM फडणवीसांसमोर टाहो
लातूर : खरा पंचनामा
पेरणीला हजारो रूपये खर्च केला, बोअर आटला, साठ फूट खोल असलेली विहीर कोरडी पडली, पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांना चारा नाही. जनावरे बाजारात कोणी विकत घेत नाही. सोयाबीन, उडीद, तुर करपून गेलं, लेकराचे शिक्षण कसं करावं, लाख रुपये दिले तरी आमचे नुकसान भरून येणार नाही. साहेब आता तुम्हीच आम्हाला वाचवा असे म्हणत शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांपाशी आपली व्यथा मांडली.
सगळं गेलं आता जगायचं कसं? असा सवाल करत टाहो फोडणारा शेतकरी आणि त्याला कवटाळत धीर देणारे मुख्यमंत्री, असे चित्र आज मराठवाड्यातील बांधा बांधावर दिसले. मराठवाड्यातील भीषण दुष्काळाच्या उंबरठ्यावर असलेल्या भागाचा दौरा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. निलंगा तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या फडणवीस यांना पाहून शेतकऱ्यांच्य अश्रूचा बांध फुटला.
नूर बाबा मिया पटेल यानी मुख्यमंत्र्यांसमोर भरलेल्या डोळ्यांनी आपली कैफियत मांडली. आसमानी संकटामुळे कायम दुष्काळाची टांगती तलवार असलेल्या शेतकऱ्यावर यंदाही तलवार कोसळणारच असे चित्र शेता शेतात दिसू लागले आहे. मुख्यमंत्री बांधावर आलेले पाहताच शेतकऱ्याने त्यांच्यासमोर हात जोडत आपल्या अश्रृंना वाट मोकळी करून दिली.
राज्यातील बळीराजा संकटात सापडला आहे याची जाणीव असलेल्या मुख्यमंत्र्यांनी शेतकरी नूर बाबा पटेल यांचा हात धरत त्यांना कवटाळले. कितीही मोठे संकट येऊ द्या सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असा धीर देत त्यांनी मायने शेतकऱ्याच्या पाठीवरून हात फिरवला.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निलंगा येथील दुष्काळी भागाचा पाहणी दौरा करण्यासाठी आले होते. त्यांनी अक्षय कुमार हिरास यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची पाहणी केली. त्यानंतर नूर पटेल यांच्या विहिरीची पाहणी केली. सहकार मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, संजय बनसोडे, आमदार बसवराज पाटील मुरूमकर, अभिमन्यू पवार, खासदार ओमराजे निंबाळकर आदी त्यांच्यासोबत उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी सोयाबीन पिकाची पाहणी केली. हे पीक पूर्णतः वाया गेले आहे. उपस्थित शेतकऱ्यांनी हातात करपून गेलेली पिके, वाळलेला ऊस मुख्यमंत्र्यांना दाखवला. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती, यंदा कोरडा दुष्काळ पडला आहे. सर्वच पिके हातून गेली आहेत. आता आम्ही जगावं कसं? असा प्रश्न शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर केला.
मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सकाळी परिस्थितीची पाहणी केली. काही भागात 50 टक्के पेक्षा कमी पाऊस झाल्याने संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला आहे. जनावराच्या पाण्याचा प्रश्न बिकट आहे. विहीर बोअर बंद पडले आहेत. अशा वेळी मुख्यमंत्र्यांचा दौरा मराठवाड्यात झाल्याने याभीषण परिस्थितीत राज्य सरकार शेतकऱ्यांना काय मदत करणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.