जत तालुक्यात ७० वर्षीय वृद्धेला लुटणाऱ्या दोन आरोपींना सांगली LCB कडून अटक; ३.३७ लाखांचा मुद्देमाल जप्त
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
सांगलीच्या जत तालुक्यातील वाषाण येथे ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेचे हात बांधून आणि कान तोडून दागिने लुटणाऱ्या दोन आरोपींना सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून २ लाख ८७ हजार ७६२ रुपयांचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली ५० हजार रुपयांची मोटरसायकल असा एकूण ३ लाख ३७ हजार ७६२ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदाशिव म्हाळाप्पा अनुसे (वय ३१) आणि धनाजी राजु खोबरे (वय १९, दोघे रा. बेळुंखी, ता. जत) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. १२ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री आठच्या सुमारास वाषाण ते बेळुंखी रोडवरील माळी वस्ती येथे राहणाऱ्या तानुबाई दाजी शेळके या एकट्या वृद्धेच्या घरात घुसून आरोपींनी कापडाने त्यांचे हात बांधले आणि कानातील व गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून पळ काढला होता. या घटनेत आजींचा कान तुटल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार केले. ग्रामीण भागातील वस्तीवर घडलेल्या या गुन्ह्यात सुरुवातीला कोणताही तांत्रिक पुरावा उपलब्ध नव्हता. दरम्यान, ५ सप्टेंबर २०२६ रोजी पोलीस अंमलदार केरुबा चव्हाण यांना खबर मिळाली की दोन इसम चोरीचे सोने विकण्यासाठी जत एमआयडीसी परिसरात येणार आहेत.
प्राप्त माहितीच्या आधारे पथकाने कराड-जत महामार्गावरील जायका हॉटेलसमोर सापळा रचून सीडी डिलक्स मोटरसायकलसह थांबलेल्या दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. पंचांसमक्ष घेतलेल्या अंगझडतीत आरोपींच्या पॅन्टच्या खिशात सोन्याचे दागिने मिळून आले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी २० दिवसांपूर्वी वृद्ध महिलेला लुटल्याची कबुली दिली. पोलिसांनी जप्त मुद्देमालासह दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी जत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.