Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

साताऱ्यात आकाशपाळण्याच्या परवान्यासाठी मागितली लाच, PI संग्राम शेवाळे अन् हवालदाराला ACB ने रंगेहाथ पकडले

साताऱ्यात आकाशपाळण्याच्या परवान्यासाठी मागितली लाच, PI संग्राम शेवाळे अन् हवालदाराला ACB ने रंगेहाथ पकडले 

सातारा : खरा पंचनामा 

आकाशपाळणा उभारणीच्या ना-हरकत परवान्यासाठी (NOC) लाचेची मागणी करून तडजोडीअंती 11 हजार रुपयांची लाच स्वीकारताना सातारा येथील शाहूपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार दीपक लक्ष्मण पोळ याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले.

या लाच प्रकरणात तक्रारदाराकडे लाचेची मागणी करण्यास प्रोत्साहन दिल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संग्राम आत्माराम शेवाळे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस खात्यातीलच वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यावर झालेल्या या कारवाईने सातारा पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एका 38 वर्षीय व्यावसायिकाने सातारा शहरातील आळूचा खड्डा परिसरात आकाशपाळणा लावण्यासाठी 13 सप्टेंबर रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्यात ना-हरकत परवान्यासाठी अर्ज केला होता. या परवान्याचा पाठपुरावा करण्यासाठी तक्रारदार जेव्हा गोपनीय विभागात कार्यरत असलेले पोलीस हवालदार दीपक पोळ यांना भेटले, तेव्हा पोळ यांनी पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्यासाठी 30 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराने सुरुवातीला नाईलाजाने 15 हजार रुपये दिले आणि उर्वरित रक्कम दोन दिवसांत देण्याचे आश्वासन दिले.

उर्वरित 15 हजार रुपयांसाठी हवालदार पोळ यांनी सातत्याने तगादा लावल्यामुळे अखेर तक्रारदाराने 23 सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (सातारा) कडे रीतसर तक्रार दाखल केली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर 'एसीबी'च्या पथकाने २३ सप्टेंबर रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्यात पंचांसमक्ष लाच मागणीची पडताळणी केली. या पडताळणीदरम्यान हवालदार दीपक पोळ यांनी पोलीस निरीक्षकांसाठी व स्वतःसाठी तडजोडीअंती 11 हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे, याच पडताळणी दरम्यान पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनीही या लाच मागणीस प्रोत्साहन दिल्याचे उघडकीस आले.

लाच मागणीची पडताळणी निश्चित झाल्यानंतर, 24 सप्टेंबर रोजी सातारा येथील राजवाडा परिसरातील जुना दवाखाना येथे 'एसीबी'च्या पथकाने सापळा रचला. तक्रारदाराकडून पंचांसमक्ष 11 हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना हवालदार दीपक पोळ याला पथकाने रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून आणि सहभागातून झालेल्या या लाचखोरीच्या प्रकारामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.