पुणे विभागात पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी 12 अर्ज दाखल; 342 अर्जाचे वाटप, 6 ऑक्टोबरला अर्ज भरण्याची मुदत संपणार
पुणे : खरा पंचनामा
विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून, आतापर्यंत दोन्ही मतदारसंघांतून एकूण 12 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
यामध्ये पदवीधर मतदारसंघासाठी आठ, तर शिक्षक मतदारसंघासाठी चार अर्जाचा समावेश आहे. दरम्यान, उमेदवारी अर्जाचे आतापर्यंत 342 अर्जाचे वाटप झाले असून, अर्ज दाखल करण्यासाठी ६ ऑक्टोबर ही अंतिम मुदत आहे.
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघासाठी शनिवारी 33 व्यक्तींना 55 उमेदवारी अर्जाचे वाटप करण्यात आले. आतापर्यंत 119 व्यक्तींना एकूण 205 अर्ज वितरित करण्यात आले आहेत. या मतदारसंघात शनिवारी आठ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने आतापर्यंत दाखल अर्जाची संख्या आठ झाली आहे.
दुसरीकडे, पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी शनिवारी 16 व्यक्तींना 28 अर्जाचे वाटप करण्यात आले. आतापर्यंत 75 व्यक्तींना एकूण 137 अर्ज वितरित झाले आहेत. शनिवारी तीन अर्ज दाखल झाल्याने शिक्षक मतदारसंघातील एकूण दाखल अर्जाची संख्या चार झाली आहे. त्यामुळे दोन्ही मतदारसंघांतून आतापर्यंत 12 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवारी (ता. 06) दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर बुधवारी (ता. 07) सकाळी 11 वाजल्यापासून विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात अर्जाची छाननी केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शुक्रवारी (ता. 09) दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत असणार आहे.
निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार, पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही मतदारसंघांसाठी 23 ऑक्टोबरला सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान होणार आहे. त्यानंतर 27 ऑक्टोबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 31 ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.