Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"आश्वासने नको, तर ठोस कारवाई हवी"; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरुन राहुल गांधींचा फडणवीसांवर निशाणा

"आश्वासने नको, तर ठोस कारवाई हवी"; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरुन राहुल गांधींचा फडणवीसांवर निशाणा 

मुंबई : खरा पंचनामा 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरण, रखडलेली भरती प्रक्रिया आणि विविध गैरकारभाराविरोधात पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे गेल्या चार दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या 'सत्याग्रह' आंदोलनाला आता राष्ट्रीय पातळीवरूनही मोठा पाठिंबा मिळत आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रत्यक्ष आंदोलनाला भेट दिल्यानंतर, आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत आंदोलक विद्यार्थांना पाठिंबा जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांबाबत आपण यापूर्वीच मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगितले होते. मात्र, त्यावर ठोस कारवाई झाली नसल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.

राहुल गांधी यांची पोस्ट

राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट करत म्हटले की, "पुण्यातील 'छात्रों की गूँज' या कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी आपल्या सर्व समस्या माझ्यासमोर मांडल्या होत्या. पेपर लीक, रखडलेल्या भरत्या, महागडे शिक्षण, हॉस्टेलची दुरवस्था आणि DBT मध्ये झालेली फसवणूक, अशा अनेक समस्या आहेत.

त्यावर आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले होते की, MPSC मध्ये सुधारणा करा, परीक्षा पद्धती पारदर्शक करा आणि या मुलांचे ऐका. परंतु काहीही झाले नाही. म्हणूनच आज तेच विद्यार्थी पुण्यात सत्याग्रहावर बसले आहेत."

विद्यार्थ्यांच्या मागण्या

एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा आणि त्यांच्या जागी एका प्रामाणिक, योग्य अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. आयोगातील 70,000 पेक्षा जास्त रिक्त सरकारी पदे त्वरित भरावीत, परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक करावी, यासह अनेक मागण्या विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहेत.

आश्वासने नको, तर ठोस कारवाई हवी

राहुल गांधींनी पुढे लिहिले की, "विद्यार्थ्यांच्या या मागण्या गैर नाहीत. त्यांना आश्वासने नको, तर ठोस कारवाई हवी आहे. महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने या आंदोलनाला 'सत्याग्रह' असं नाव दिलं आहे. युवक काँग्रेस आणि NSUI या आंदोलनात सातत्याने विद्यार्थ्यांच्या सोबत उभे आहेत."

"विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत त्यांच्याशी खांद्याला खांदा लावून लढत राहण्याचे निर्देश मी दिले आहेत. ज्या संस्थेवर विद्यार्थ्यांचे भविष्य अवलंबून आहे, त्यावर कब्जा करण्यात आला आहे. आम्ही हे असेच चालू देणार नाही," असा इशारा देखील राहुल गांधी यांनी दिला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.