Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

चुलत्याचे 15 तोळे चोरले, नवीकोरी थार घेतली, दरोडा पचवला, पण एका चुकीने झाला गजाआड, पुतण्याचा कांड कसा उलगडला?

चुलत्याचे 15 तोळे चोरले, नवीकोरी थार घेतली, दरोडा पचवला, पण एका चुकीने झाला गजाआड, पुतण्याचा कांड कसा उलगडला?

कोल्हापूर : खरा पंचनामा 

जिल्ह्याच्या पन्हाळा तालुक्यातून एक अजब प्रकार उघडकीस आला आहे. इथं एका १९ वर्षीय उच्चशिक्षित पुतण्याने आपल्याच सख्ख्या चुलत्याच्या घरावर डल्ला मारत तब्बल १५ तोळे सोने चोरले. विशेष म्हणजे, त्या सोन्याच्या पैशातून आलिशान 'महिंद्रा थार' गाडी खरेदी केली आणि ज्या चुलत्याच्या सोन्यावर हात साफ केला, त्याच चुलत्याच्या हस्ते नव्याकोऱ्या गाडीची पूजा करून घेतली ! अवघ्या ४८ तासांत पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश करत आरोपी पुतण्याला अटक केली आहे. विशेष म्हणजे पुतण्याने आपल्या चुलत्याच्या घरात केलेली चोरी पचवली होती. मात्र एका चुकीने तो गजाआड झाला.

पन्हाळा तालुक्यातील सातवे गावातील रहिवासी असलेला समर पोपट चव्हाण (वय १९) हा तरुण डिप्लोमा इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत आहे. त्याच्या घराशेजारीच त्याचे चुलत चुलते उमेश मारुती चव्हाण यांचं कुटुंब राहतं. नातं जवळचं असल्याने समरचे चुलत्याच्या घरात सतत येणं-जाणं होतं. याचाच गैरफायदा घेत समरने महिनाभरापूर्वी उमेश चव्हाण यांच्या घरात चोरी केली. तिजोरीतून त्याने १४.५ लाख रुपये किमतीचं १५ तोळे सोन्याचे दागिने लांबवले. हे चोरीचे सोने त्याने सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील देववाडी येथील सोनार संग्राम बाबासो मोरे याला १० लाख रुपयांना विकून टाकले.

सोने विकून मिळालेल्या १० लाख रुपयांच्या घसघशीत रकमेतून समरने दसऱ्याच्या मुहुर्तावर एक नवी कोरी 'महिंद्रा थार' गाडी खरेदी केली. दारात गाडी आल्यानंतर त्याने उत्साहात गाडीच्या स्वागताचा आणि पूजनाचा मोठा सोहळा आयोजित केला. धक्कादायक भाग म्हणजे, ज्या चुलत्याच्या घरातील सोन्यावर त्याने डल्ला मारला होता, त्याच उमेश चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांना नव्या थारच्या पूजनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आदराने बोलावलं. चुलत्याने देखील आनंदाने पुतण्याच्या नवीन गाडीची पूजा केली आणि नारळ फोडला.

पूजनाचा सोहळा आटोपल्यानंतर उमेश चव्हाण यांच्या पत्नीने अंगावर दागिने घालण्यासाठी घरातील तिजोरी उघडली. परंतु, ज्या डब्यात सोन्याचे दागिने ठेवले होते, तो डबाच गायब असल्याचे पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. विशेष म्हणजे, तिजोरीतील आजीचे जुने सोने पूर्णपणे सुरक्षित होते, मात्र केवळ उमेश चव्हाण आणि त्यांच्या पत्नीचेच १५ तोळे सोने गायब झाले होते. घरातीलच कोणालातरी तिजोरीची संपूर्ण माहिती असण्याचा संशय बळावल्याने चव्हाण कुटुंबाने तात्काळ कोडोली पोलीस ठाण्यात जाऊन चोरीची तक्रार नोंदवली.

पोलिसांनी तपासाची चक्रं वेगानं फिरवत १९ वर्षीय समर चव्हाण याच्याकडे कसून चौकशी केली. अचानक १० लाखांची थार गाडी कशी आली, याबाबत विचारणा केली असता, समरने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी शेअर मार्केट ट्रेडिंगमधून नफा मिळाल्याची खोटी कहाणी सांगितली. मात्र, तो कोणताही ठोस पुरावा देऊ शकला नाही. पोलिसांनी त्याचे बँक खाते तपासले असता, शिराळ्यातील सोनार संग्राम मोरे याच्याकडून ३ लाख ४० हजार रुपये जमा झाल्याचं निष्पन्न झालं. या एका चुकीने समरनेच हे दागिने चोरल्याचा संशय बळावला. पोलिसांचा पोलिसी खाक्या पाहताच समरने चोरीची कबुली दिली.

या प्रकरणी पोलिसांनी सोनार संग्राम मोरे यालाही कागदपत्रे न तपासता स्वस्तात सोने खरेदी केल्याप्रकरणी सह-आरोपी म्हणून अटक केली. पोलिसांनी नवीकोरी थार, सोनं आणि मोटरसायकल असा एकूण ३० लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पन्हाळा न्यायालयाने दोन्ही आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.