कर्जदारांना मोठा धक्का ! 44 महिन्यांनंतर RBI ने वाढवला रेपो रेट; तुमच्या EMIवर होणार थेट परिणाम
दिल्ली : खरा पंचनामा
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. RBIच्या पतधोरण समितीने (MPC) रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉइंट्स म्हणजेच 0.25 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे रेपो रेट 5.25 टक्क्यांवरून 5.50 टक्क्यांवर पोहोचला आहे. या निर्णयाचा थेट परिणाम गृहकर्ज, वाहन कर्ज आणि इतर कर्जाच्या व्याजदरावर होण्याची शक्यता आहे.
RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज सकाळी 10 वाजता पतधोरण समितीच्या बैठकीतील निर्णय जाहीर केला. महागाईचा वाढता दबाव आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ लक्षात घेऊन व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जात आहे.
रेपो रेटमध्ये वाढ झाल्यामुळे बँकांसाठी RBI कडून कर्ज घेणे महाग होणार आहे. त्याचा परिणाम बँकांच्या कर्जदरांवर होऊ शकतो. त्यामुळे गृहकर्ज किंवा वाहन कर्जाचा व्याजदर वाढल्यास ग्राहकांच्या मासिक EMIमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे.
रेपो रेट वाढल्यानंतर बँका त्यांच्या कर्जावरील व्याजदरात वाढ करू शकतात. विशेषतः फ्लोटिंग रेटवर कर्ज घेतलेल्या ग्राहकांना याचा परिणाम जाणवू शकतो. व्याजदर वाढल्यास दोन प्रकारे परिणाम होऊ शकतो. कर्जदाराचा EMI वाढू शकतो किंवा कर्जाची मुदत वाढू शकते.
उदाहरणार्थ, एखाद्या ग्राहकाने मोठ्या रकमेचे गृहकर्ज घेतले असेल आणि त्याचा व्याजदर रेपो रेटशी जोडलेला असेल, तर नवीन दर लागू झाल्यानंतर त्याच्या मासिक हप्त्यात वाढ होऊ शकते. मात्र, नेमका EMI किती वाढेल हे कर्जाची रक्कम, उर्वरित कालावधी आणि बँकेच्या व्याजदरावर अवलंबून असेल.
रेपो रेट वाढल्याचा परिणाम केवळ कर्जावरच होत नाही. बँका ठेवींवरील व्याजदरातही बदल करू शकतात. त्यामुळे आगामी काळात काही बँका मुदत ठेवींवरील म्हणजेच FDवरील व्याजदर वाढवण्याची शक्यता आहे. यामुळे बचत करणाऱ्या ग्राहकांना काहीसा फायदा मिळू शकतो.
2026मध्ये RBIची ही चौथी MPC बैठक होती. यापूर्वी एप्रिल, जून आणि ऑगस्टमध्ये झालेल्या बैठकीत रेपो रेट 5.25 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला होता. आता मात्र RBIने 25 बेसिस पॉइंट्सची वाढ करत रेपो रेट 5.50 टक्क्यांवर नेला आहे. यापूर्वी 2023 मध्येही RBIने रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉइंट्सची वाढ केली होती. त्यानंतर दीर्घ काळ व्याजदरात मोठा बदल करण्यात आलेला नव्हता.
रेपो रेट म्हणजे RBI ज्या दराने देशातील बँकांना अल्प मुदतीसाठी कर्ज देते तो दर. RBIने हा दर वाढवला की बँकांसाठी निधी उभारण्याचा खर्च वाढतो. त्याचा परिणाम पुढे ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या व्याजदरावर होऊ शकतो.
याउलट, रेपो रेट कमी झाल्यास बँकांना स्वस्त दरात निधी मिळतो. त्यामुळे कर्जाचे व्याजदर कमी होऊन ग्राहकांच्या EMIचा भार कमी होण्याची शक्यता असते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.