MPSC आंदोलनाला कोर्टात आव्हान; रोहित पवारांचा संताप, थेट म्हणाले 'कितीही दम लावा.'
पुणे : खरा पंचनामा
पुण्यात गेल्या सात दिवसांपासून विविध मागण्यांसाठी MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पाठिंबा दिला असून ते स्वतः आंदोलनात सहभागी झाले आहेत. MPSC आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, ही प्रमुख मागणी आंदोलक विद्यार्थ्यांची आहे.
या आंदोलनामुळे पुण्यात वाहतूक कोंडी होत असून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत असल्याचा दावा करत काही पुणेकरांनी न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवरून आता राजकीय वातावरणही तापले आहे. याबाबत माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी संताप व्यक्त करत याचिकाकर्त्याबाबत गंभीर आरोप केले आहेत.
रोहित पवार म्हणाले, "काही याचिकाकर्ते काल हायकोर्टात गेले असल्याचे मला समजले. त्यातील एक याचिकाकर्ता हा महानगरपालिकेतील भाजपच्या एका प्रमुख नेत्याचा कार्यकर्ता आहे. तो त्या नेत्याचे अर्थकारण पाहतो. त्याच्याकडे मशिन्स आहेत, महानगरपालिकेची कामे तो घेतो आणि बिल्डिंग कन्स्ट्रक्शनची कामेही करतो," असा दावा त्यांनी केला.
"तो भाजपचा कार्यकर्ता असल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र, कितीही दम लावा, आम्ही विद्यार्थ्यांच्या बाजूने तिथे उभे राहणार," असे रोहित पवारांनी ठणकावून सांगितले.
MPSC विद्यार्थ्यांनी आंदोलनासाठी निवडलेल्या ठिकाणावरूनही सध्या वाद सुरू आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना रोहित पवार यांनी सांगितले की, आंदोलनासाठी अलका चौक आणि अहिल्या लायब्ररी यांसारखे पर्याय उपलब्ध होते. मात्र, विद्यार्थ्यांची मोठी संख्या लक्षात घेता त्या ठिकाणी आंदोलन केल्यास पुणेकरांना अधिक त्रास झाला असता.
त्यामुळे एस. एम. जोशी मार्गावरील पत्रकार भवन परिसरात आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. या मार्गाच्या दोन्ही बाजूंना पर्यायी रस्ते उपलब्ध आहेत. तसेच रुग्णालयांकडे जाण्यासाठीही पर्यायी मार्ग केला. या परिसरात दोन्ही बाजूंना स्मशानभूमी असल्याने इतर भागांच्या तुलनेत येथे वर्दळ कमी असल्याचेही रोहित पवार म्हणाले.
माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी महाज्योतीच्या आज झालेल्या परीक्षेबाबतही गंभीर आरोप केला. "तुमच्याशी बोलत असताना एक खंताची गोष्ट सांगायची आहे. महाज्योतीचा पेपर आज घेतला जात आहे. त्या पेपरमध्येही घोळ झालेला आहे," असा दावा त्यांनी केला. त्यांच्या या आरोपामुळे परीक्षेच्या प्रक्रियेबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दरम्यान, MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. विविध राजकीय नेते आंदोलनस्थळी भेट देत असून विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवत आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला आता राजकीय रंगही चढताना दिसत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.