अर्थमंत्री निर्मला सीतारमण भाषणाला उभ्या राहिल्या अन् अचानक जोरदार घोषणाबाजी; नंतर चंद्राबाबू नायडूंनी स्वतः माईक हाती घेतला अन्...
अमरावती : खरा पंचनामा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या आंध्र प्रदेशातील एका कार्यक्रमातील व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. 2 ऑक्टोबर रोजी अन्नमय्या जिल्ह्यातील मदनपल्ले येथे आयोजित कार्यक्रमात सीतारमण भाषणासाठी उभ्या राहिल्यानंतर काही वेळातच गर्दीतून मोठ्या आवाजात घोषणा ऐकू आल्या. त्यामुळे सीतारमण यांना काही काळ आपलं भाषण थांबवावं लागलं. या घटनेनंतर कार्यक्रमस्थळी नेमकं काय घडलं, यावर राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
मदनपल्ले येथे 1 लाख कोटी रुपयांच्या ग्लोबल हॉर्टिकल्चर हब प्रकल्पाचा शुभारंभ तसेच इंडियन स्कूल ऑफ अॅग्रीकल्चरच्या पायाभरणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान निर्मला सीतारमण भाषणासाठी पोडियमवर आल्या. त्यावेळी उपस्थितांकडून घोषणाबाजी आणि मोठा आवाज सुरू झाला. काही जण स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची मागणी करत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे काही काळ कार्यक्रमातील वातावरण गोंधळाचे झाले आणि सीतारमण यांना आपलं भाषण थांबवून उपस्थितांना शांत राहण्याचं आवाहन करावं लागलं.l
सीतारमण यांनी गर्दीला शांत राहण्याची आणि आपलं म्हणणं ऐकून घेण्याची विनंती केली. मात्र काही काळ परिस्थिती कायम राहिल्यानंतर मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी स्वतः माईक हाती घेतला. त्यांनी उपस्थितांना शांत राहण्याचं आणि अर्थमंत्र्यांचं भाषण ऐकण्याचं आवाहन केलं. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आणि निर्मला सीतारमण यांनी पुढे आपलं भाषण सुरू केलं.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. काँग्रेसचे राज्यसभा खासदार जयराम रमेश यांनी या घटनेवर भाष्य करताना जनतेमध्ये सरकारविरोधात नाराजी असल्याचा दावा केला. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना स्वतः माईक हाती घेऊन लोकांना शांत करावं लागलं, असा दावा त्यांनी केला. मात्र चंद्राबाबू नायडूंनी जयराम रमेश यांच्या दाव्याला थेट उत्तर दिलं आहे. नायडूंनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत व्हायरल व्हिडीओबाबत स्पष्टीकरण दिलं. त्यांच्या म्हणण्यानुसार, कार्यक्रमात जे घडलं ते जनतेचा संताप किंवा सरकारविरोधातील नाराजी नव्हती, तर उपस्थितांकडून मिळालेला उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद होता.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.