डायल ११२ वर 'AK-47' ची खोटी माहिती देऊन धिंगाणा घालणाऱ्या शिवरवाडीच्या सरपंचासह दोघांवर गुन्हा दाखल
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
शासकीय आपत्कालीन तक्रार सुविधा 'डायल ११२' वर एका ग्रामस्थाकडे 'AK-47' ही घातक बंदूक असल्याची खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या आणि नशेत सार्वजनिक रस्त्यावर धिंगाणा घालणाऱ्या शिवरवाडीच्या सरपंचासह दोघांविरोधात शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३ ऑक्टोबरच्या मध्यरात्री शिवरवाडी (ता. शिराळा) येथील जिल्हा परिषद शाळेसमोरील सार्वजनिक रस्त्यावर घडली.
याबाबत मिळालेली सविस्तर बातमी अशी की, शिवरवाडी गावचे सरपंच श्रीकांत रंगराव पाळेकर (वय ३५, रा. शिवरवाडी) यांनी ३ ऑक्टोबर रोजी रात्री ११:०९ वाजेच्या सुमारास शासकीय तक्रार सुविधा 'डायल ११२' वर कॉल केला. गावातील विनायक अर्जुन बेद्रे यांच्याकडे 'AK-47' बंदूक आहे, असा बनाव रचून त्यांनी कॉलवरून माहिती दिली. मात्र, प्रत्यक्षात बेद्रे यांच्याकडे कोणतीही बंदूक नसताना, पोलिसांना त्रास व्हावा आणि त्यांची दिशाभूल व्हावी या हेतूने ही खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाले.
नशेत सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा
खोटी माहिती देण्यासोबतच आरोपी सरपंच श्रीकांत पाळेकर व आप्पा सो शंकर पाळेकर (वय ३५, रा. शिवरवाडी) या दोघांनी कोणत्याही अमली पदार्थाच्या किंवा दारूच्या नशेत जिल्हा परिषद शाळेसमोरील सार्वजनिक रस्त्यावर मोठ्याने आरडाओरडा करत गोंधळ घातला व दंगा केला.
या प्रकरणी शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार इरफान अब्बास मुल्ला (वय ४०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, दोन्ही आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २१७ आणि महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ८५(१), ८५(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलीस हवालदार कदम यांनी गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार पाटील (बॅज क्र. ६५०) करत आहेत. गुन्ह्याचा सविस्तर अहवाल शिराळा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी (JMFC) न्यायालयात पाठवण्यात आला आहे. गावच्या प्रथम नागरिकावरच (सरपंचावर) असा गंभीर गुन्हा दाखल झाल्याने शिराळा परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.