राज्यात 'या' तारखेदरम्यान पुन्हा पावसाचे संकेत
मुंबई : खरा पंचनामा
राज्यात ऑक्टोबरमध्ये उन्हाचा चटका जाणवत असतानाच महाराष्ट्राच्या काही भागांत पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने १५ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर या कालावधीसाठी वर्तवलेल्या विस्तारित हवामान अंदाजानुसार, कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या काही भागांत पावसाची शक्यता आहे.
बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात हवामान प्रणाली विकसित होण्याचे संकेत मिळत असल्याने या अंदाजाला महत्त्व आले आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १५ ते १८ ऑक्टोबरदरम्यान दक्षिण भारतातील काही भागांत पावसाची शक्यता आहे.
१८ ऑक्टोबरच्या आसपास पावसाची प्रणाली उत्तरेकडे सरकण्याची शक्यता असून, त्यामुळे दक्षिण महाराष्ट्रातील काही भागांतही पाऊस पडू शकतो. मात्र, पावसाचे नेमके ठिकाण आणि त्याची तीव्रता याबाबत हवामान विभागाच्या पुढील अंदाजावर लक्ष ठेवावे लागणार आहे.
हवामान विभागाच्या चार आठवड्यांच्या अंदाजानुसार, पहिल्या आठवड्यात म्हणजे १५ ते २२ ऑक्टोबरदरम्यान दक्षिण भारतात पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच काळात ईशान्य मोसमी पावसालाही सुरुवात झाली आहे.
२२ ते २९ ऑक्टोबरदरम्यान केरळ आणि तामिळनाडूमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या काही अन्य भागांतही पावसाचे संकेत आहेत. तिसऱ्या आठवड्यात म्हणजे २९ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरदरम्यान दक्षिण भारतासह महाराष्ट्राच्या अनेक भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.