Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगली, कोल्हापूर, साताऱ्याची विजयी घोडदौड ५२ वी कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचा पहिला दिवस उत्साहात

सांगली, कोल्हापूर, साताऱ्याची विजयी घोडदौड 
५२ वी कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचा पहिला दिवस उत्साहात 

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

विश्रामबाग येथील पोलीस मुख्यालय मैदानावर शहीद अशोक कामटे क्रीडा नगरीत ५२ व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेस आज दिमाखदार सुरुवात झाली. या क्रीडा स्पर्धेत सांगली, कोल्हापूर, सोलापूर शहर, सोलापूर ग्रामीण, सातारा आणि पुणे ग्रामीण पोलीस दलातील एकूण ६६४ पुरुष आणि २३६ महिला स्पर्धक पोलीस अधिकारी व अंमलदारांनी सहभाग घेतला आहे.

आज पार पडलेल्या वैयक्तिक अॅथलेटिक स्पर्धेत उंची उडी महिला गटात साताराच्या हर्षदा गडदे, पुरुष गटात कोल्हापूरचे प्रसाद पेडणेकर, ४०० मीटर अडथळा शर्यतीत पुरुष गटातून साताऱ्याचे महादेव बांगर तर महिला गटातून पुणे ग्रामीणच्या पायल संपुडे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तसेच हातोडा फेकमध्ये कोल्हापूरचे विनायक कांबळे आणि १० किलोमीटर धावण्याच्या शर्यतीत पुणे ग्रामीणचे सुजित तिकोडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.

सांघिक खेळांमध्ये साखळी पद्धतीने सामने खेळवले जात असून व्हॉलीबॉलमध्ये पुरुष गटातून सांगली तर महिला गटातून कोल्हापूर आणि सातारा संघाने विजय मिळवून आघाडी घेतली आहे. हॅण्डबॉल पुरुष गटात सांगली व कोल्हापूर, खो-खो पुरुष गटात सोलापूर ग्रामीण तर महिला गटात सोलापूर शहर आणि पुणे ग्रामीण, तसेच कबड्डी महिला गटात कोल्हापूर संघाने विजय मिळवला आहे.

या स्पर्धा २५ ऑक्टोबर २०२६ ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ६:३० ते रात्री १०:०० या वेळेत सुरू राहणार आहेत. नागरिकांना या स्पर्धा प्रत्यक्ष पाहता येणार असून क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक  तुषार दोशी यांनी केले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.