Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

हुकूमशहाचा पहिला पराभव महाराष्ट्रातूनच..; ठाकरे बंधूंच्या 'गर्जना मोर्चा'त निवडणूक आयोगाविरोधात एल्गार

हुकूमशहाचा पहिला पराभव महाराष्ट्रातूनच..; ठाकरे बंधूंच्या 'गर्जना मोर्चा'त निवडणूक आयोगाविरोधात एल्गार

मुंबई : खरा पंचनामा 

निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली मुंबईत 'गर्जना मोर्चा' काढण्यात आला. मेट्रो सिनेमा ते मुंबई महापालिका मुख्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चात महाविकास आघाडीसह विविध विरोधी पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख, शशिकांत शिंदे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकार, भाजप आणि निवडणूक आयोगावर जोरदार निशाणा साधला.

अनिल देशमुख यांनी या मोर्चाला आपल्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितलं. शशिकांत शिंदे, जयंत पाटील आणि जितेंद्र पाटील यांच्यासह पक्षाचे नेते या आंदोलनात सहभागी झाल्याचं त्यांनी नमूद केलं. "जो डाले वोट पे डाका, उसका नाम ज्ञानू काका," अशी घोषणा देत देशमुख यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका केली. देशमुख यांच्या म्हणण्यानुसार, देशभरात मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ होत असून मतदारांची नावे यादीतून काढली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. निवडणूक आयोगातील तीन अधिकाऱ्यांपैकी दोन अधिकाऱ्यांनीही कथित गैरप्रकारांबाबत लेखी तक्रार केली असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, त्यानंतरही केंद्र सरकारकडून कारवाई झाली नसल्याचे ते म्हणाले.

महाराष्ट्र, गोवा आणि पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमध्ये निवडणूक प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत, असा दावा करत देशमुख यांनी आयोगावर गंभीर आरोप केले. "ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा आणि त्यांच्यावर एफआयआर दाखल करून कारवाई करावी," अशी मागणी त्यांनी केली. आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, हीदेखील प्रमुख मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.

शशिकांत शिंदे यांनी मोर्चातील गर्दीचा संदर्भ देत हा जनतेच्या रोषाचा पुरावा असल्याचं म्हटलं. "हुकूमशहाचा पहिला पराभव याच मराठ्यांच्या क्रांतीभूमीतून होईल," असा आक्रमक दावा त्यांनी केला. भाजपवर निशाणा साधताना शिंदे यांनी निवडणुका जिंकल्यानंतर विरोधी पक्षांचे आमदार-खासदार फोडण्याच्या राजकारणावरही टीका केली. निवडणूक आयोगाच्या कथित गैरप्रकारांविरोधात ही लढाई असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय निश्चित होता, असा दावा करत शिंदे यांनी यंत्रणेचा आधार घेऊन निवडणूक जिंकण्यात आल्याचा आरोप केला. महाराष्ट्रात दोन कोटी बोगस मतदारांची नावं नोंदवली गेल्याचा आरोपही त्यांनी केला. "जर या दोन कोटी लोकांनी मतदान केलं असेल, तर विधानसभेची फेरनिवडणूक घ्यावी लागेल," असंही ते म्हणाले.

'मतांची चोरी होतेय, लोकशाही वाचवावी लागेल'

बाळासाहेब थोरात यांनीही निवडणूक प्रक्रियेवरून केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली. देशात जनतेच्या मतांची चोरी होत असल्याची भावना निर्माण झाली असून, राहुल गांधी यांनी याबाबत अनेकदा पुराव्यांसह प्रश्न उपस्थित केल्याचं त्यांनी सांगितलं. निवडणूक आयोगाच्या नियुक्ती प्रक्रियेतील बदलावरही थोरात यांनी आक्षेप घेतला. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला या प्रक्रियेतून दूर करण्यात आल्यापासूनच निवडणूक आयोगाला सत्तेच्या नियंत्रणाखाली आणण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचा आरोप त्यांनी केला. "महाविकास आघाडी महाराष्ट्रात पराभूत होऊ शकत होती का? बिलकूल नाही," असा सवाल करत थोरात यांनी निवडणुकीतील कथित गैरप्रकारांमुळे सत्ता मिळवल्याचा आरोप केला. मतांच्या चोरीसोबतच नोकऱ्यांचीही चोरी होत असल्याचं ते म्हणाले.

ज्ञानेश कुमार हे या कथित भ्रष्ट कारभाराचे प्रतीक असल्याची टीका करत थोरात यांनी 2014 पासूनचा काळ भारताच्या इतिहासातील 'काळा खंड' ठरेल, असा दावा केला. लोकशाही वाचवण्यासाठी जनतेने संघर्ष करण्याचे आवाहनही त्यांनी केलं. या मोर्चातून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची, कथित गैरप्रकारांची चौकशी करण्याची आणि भविष्यात बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी आक्रमकपणे मांडली. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या या 'गर्जना मोर्चा' मुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.