Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मिरज रेल्वे स्टेशन परिसरात हत्याराचा धाक दाखवून लुटमार करणारा सराईत गुन्हेगार अवघ्या दोन तासात जेरबंदमिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई

मिरज रेल्वे स्टेशन परिसरात हत्याराचा धाक दाखवून लुटमार करणारा सराईत गुन्हेगार अवघ्या दोन तासात जेरबंद
मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई 

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

मिरज रेल्वे स्टेशन परिसरातील अरविंद हेअर कटिंग सलूनमध्ये दाढी करण्यासाठी गेलेल्या एका नागरिकाला चाकूचा धाक दाखवून आणि गंभीर दुखापतीची भीती घालून रोख रक्कम हिसकावून घेणाऱ्या सराईत गुन्हेगाराला महात्मा गांधी चौक पोलिसांनी अवघ्या दोन तासात जेरबंद केले आहे. अल्ताफ उर्फ हटेला अन्वर शेख (वय २२, रा. ख्वाजा बस्ती, मिरज) असे या अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

या गुन्ह्यातील फिर्यादी मधुकर खंडाप्पा कांबळे हे ७ ऑक्टोबर २०२६ रोजी दुकानात गेले असताना ही जबरी चोरीची घटना घडली होती. या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०९ (४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे व त्यांच्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे तात्काळ कारवाई केली.

फिर्यादी पोलीस ठाण्यात आल्यानंतर अवघ्या दोन तासाच्या आत पोलिसांनी संशयित आरोपीला ९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री शिताफीने ताब्यात घेतले. आरोपी हा सांगली जिल्ह्याच्या पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर २०२५ मध्ये महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत हद्दपारीची कारवाई देखील करण्यात आली होती. अटक केलेल्या आरोपीला न्यायालयासमक्ष हजर केले असता न्यायालयाने त्याला १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई सुरू असून नागरिकांनी अशा गुन्हेगारांची माहिती तात्काळ पोलीस प्रशासनाला द्यावी, असे आवाहन महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यातर्फे करण्यात आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.