नवी दिल्ली : खरा पंचनामा
सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीच्या नियुक्त्यांवरून निवृत्त न्यायमूर्ती संजय किशन कौल यांनी आपल्या पुस्तकात उपस्थित केलेल्या आक्षेपांवर भारताचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
"माझ्या कार्यकाळात सर्वोच्च न्यायालयात झालेल्या न्यायमूर्तीच्या सर्व नियुक्त्या कॉलेजियमच्या सर्वसंमतीनेच झाल्या असून, या सर्व शिफारशींना न्यायमूर्ती कौल यांनीही मान्यता दिली होती," असे माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी स्पष्ट केले आहे.
'जुगरनॉट' प्रकाशनातर्फे प्रसिद्ध होत असलेल्या 'विदाऊट फिअर ऑर फेव्हर' या कौल यांच्या आत्मचरित्रातील दाव्यांमुळे न्यायपालिका आणि केंद्र सरकारमधील सत्तासमीकरणांवरून पुन्हा एकदा वाद पेटला आहे. काँग्रेस पक्षाने या पुस्तकाचा हवाला देत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
माजी न्यायमूर्ती कौल यांनी आपल्या पुस्तकात सर्वोच्च न्यायालयातील सहा रिक्त जागा भरण्यासाठी झालेल्या एका कॉलेजियम बैठकीचा संदर्भ दिला आहे.
या बैठकीपूर्वी पाच नावांवर एकमत झाले होते; मात्र न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी ऐनवेळी सहावे नाव पुढे केले आणि या नावावर सरकारचे मत काय आहे, हे जाणून घेण्यासाठी फोन करावा का, अशी विचारणा केली, असा दावा कौल यांनी केला.
या सर्व आरोपांवर भाष्य करताना माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी 'द इंडियन एक्स्प्रेस'ला सांगितले की, मी संजय कौल यांचे पुस्तक वाचलेले नाही. त्यामुळे त्यांनी कोणत्या संदर्भात हे लिहिले आहे हे पाहिल्याशिवाय सविस्तर प्रतिक्रिया देणे कठीण आहे. मात्र सरन्यायाधीश म्हणून माझ्या कार्यकाळात कॉलेजियमच्या बैठका अत्यंत उत्तम वातावरणात पार पडल्या.
न्यायमूर्ती कौल यांच्यासोबतही अत्यंत आदराचे संबंध होते.
तसेच हिंदुस्तान टाइम्सनेही चंद्रचूड यांची यावरील प्रतिक्रिया आपल्या वृत्तात दिली आहे. "कॉलेजियमचे अधिकृत ठराव आणि शिफारशींमागील कारणांसहित सर्व माहिती सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर सार्वजनिक करण्यात आलेली आहे. या सर्व नोंदी पाहिल्यास हे स्पष्ट होते की, सर्व निर्णय एकमताने घेण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीच्या नियुक्तीसाठी केंद्र सरकारकडे पाठवलेल्या एकाही प्रस्तावावर न्यायमूर्ती कौल यांनी असहमती नोंदवलेली नाही", असेही चंद्रचूड म्हणाले आहेत.
माजी न्यायमूर्ती संजय किशन कौल यांनी आपल्या आत्मचरित्रात तत्कालीन सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड हे 'सरकारबाबत अत्यंत मवाळ होते, असा दावा कौल यांनी केला आहे. कॉलेजियमने एखाद्या उमेदवाराच्या नावावर विचारविनिमय करण्यापूर्वीच कार्यकारी यंत्रणेशी चर्चा करून सरकारची पूर्वसंमती मिळवणे योग्य नाही, असे मत त्यांनी मांडले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
