दुष्काळ आहे कुठे? मुख्यमंत्र्यांच्या शहरात कार धुण्यासाठी चक्क पिण्याच्या पाण्याचा वापर; दंडाचा इशारा, पण कारवाई कधी?
नागपूर : खरा पंचनामा
राज्य सरकारने १० टक्के पाणीकपातीचा निर्णय घेतला असून सर्व महापालिका, नगर पालिका, नगर पंचायत, ग्रामपंचायतला निर्देश दिले आहे. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच शहरात पाणीकपात तर नाहीच, उलट नळातील पिण्याचा पाण्याचा वापर चक्क कार धुण्यासाठी केला जात आहे. महापालिकेने केलेल्या तपासणीत ही बाब उघडकीस आली. परंतु कारवाईबाबत महापालिकाच तळ्यात मळ्यात असल्याचे चित्र आहे.
महापालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांनी कार वॉशिंग सेंटरची तपासणी करण्याचे व पिण्याचे पाणी कार धुण्यास वापरणाऱ्यांवर ५ हजारांचा दंड ठोठावण्याचे निर्देश दिले होते. सोमवारपासून तपासणी सुरू करण्यात आली. यात धरमपेठ झोनमध्ये चार ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा वापर कार धुण्यासाठी केला जात असल्याचे पुढे आले. परंतु कारवाई न करताच पथक परतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पिण्याच्या पाण्याची संभाव्य टंचाई लक्षात घेऊन महापालिकेने पाण्याचा दुरुपयोग कारणाऱ्याविरुद्ध धडक कारवाई सुरू केली. पहिल्या दिवशी उपद्रव शोध पथक व ओसीडब्ल्यूच्या पथकाने शहरातील दहाही झोनमधील १६१ कार वॉशिंग सेंटरची तपासणी केली. यात कार व इतर वाहने धुण्यासाठी विहिरीचे पाणी, बोरवेलसोबतच नळातील पिण्याच्या पाण्याचा वापर होत असल्याचे आढळून आले. धरमपेठ झोनमध्ये एकूण २६ कार वॉशिंग सेंटरची पाहणीत चार वॉशिंग सेंटरचे मालक बेकायदेशीरपणे नळाच्या पाण्याचा वापर वाहने धुण्यासाठी करीत असल्याचे आढळले. परंतु पथकाने त्यांच्यावर कुठलाही दंड आकारला नाही.
झोननिहाय कार वॉशिंग सेंटरची तपासणी सुरू करण्यात आली. या तपासणीचा अहवाल आल्यानंतर कार धुण्यासाठी नळाच्या पाण्याचा वापर करणाऱ्यांवर ५ हजारांच्या दंडासह गुन्हे दाखल करण्यात येईल, असे महापालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांनी नमुद केले. त्यामुळे सध्या केवळ तपासणीच सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहे. जलतरण तलावांची सखोल तपासणी करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहे. परंतु सोमवारी केवळ कार वॉशिंग सेंटरचीच तपासणी करण्यात आली. रस्ते स्वच्छता, बागकाम आणि बांधकामाच्या कामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करताना आढळल्यासही पाच हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याचे निर्देश आयुक्तांनी शनिवारी घेतलेल्या बैठकीत दिले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.