पुणे पदवीधरसाठी मतमोजणीला सुरूवात, पहिल्या टप्प्यातील कौल दुपारनंतर येणार समोर; कोण मारणार बाजी ?
पुणे : खरा पंचनामा
चुरशीने झालेल्या पुणे विभागातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी ८ वाजल्यापासून सुरूवात झाली आहे. पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे ही मतमोजणी प्रक्रिया होत आहे.
दोन्ही मतदारसंघांतील निकाल जाहीर होण्यास २४ तासांचा कालावधी लागेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान, पदवीधरसाठी पहिल्या टप्प्यातील कौल दुपारनंतर समोर येणार आहे.
पदवीधर आणि शिक्षक विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (ता. २३) मतदान झाले. त्यानंतर पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील मतपेट्या पुणे येथे नेल्या. आज मतमोजणी होणार आहे. यासाठी पाच जिल्ह्यांतील तहसीलदार, प्रांताधिकारी आणि उपजिल्हाधिकारी पुणे येथे गेले आहेत. त्यांचे प्रशिक्षण विभागीय आयुक्त तेली-उगले यांनी घेतले.
तेली-उगले म्हणाल्या, 'मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करण्याचे काम केले आहे. मतमोजणीच्या फेरीदरम्यान शांततेत, चूक होऊ न देता आणि दडपण न घेता काम करावे. व्यवस्थित सर्व नमुने भरून संबंधित पथकाकडे जमा करावेत. मतपत्रिका वैध-अवैधबाबतचे मुद्दे, आक्षेप योग्यरीत्या निकाली काढावेत.
अरुण आनंदकर यांनी शिक्षक मतदारसंघातील मतमोजणी अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. सहआयुक्त संजय पलांडे यांनी मतमोजणीच्या संबंधित बाबींचे मार्गदर्शन केले. पदवीधर मतदारसंघात ४७, तर शिक्षक मतदारसंघातून ३० उमेदवार रिंगणात आहेत. या ७७ उमेदवारांचे भवितव्य उद्या २८ ऑक्टोबर रोजी ठरणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.