Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पुढील सहा महिन्यांत मोठ्या राजकीय घडामोडी घडणार; वनमंत्री गणेश नाईक यांचे भाकीत

पुढील सहा महिन्यांत मोठ्या राजकीय घडामोडी घडणार; वनमंत्री गणेश नाईक यांचे भाकीत

नवी मुंबई : खरा पंचनामा 

राज्याच्या राजकारणात येत्या पाच-सहा महिन्यांत बऱ्याच मोठ्या घडामोडी घडतील, असे भाकीत वनमंत्री गणेश नाईक यांनी केले आहे. शनिवारी, वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित गणेशोत्सव स्पर्धा आणि पारितोषिक वितरण समारंभानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केले. आपण केलेली भाकिते काही काळाने का होईना, खरी ठरत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

राज्यात सध्या मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी प्रसिद्ध केलेल्या ध्वनिमुद्रित संभाषणाची चर्चा सुरू असतानाच वनमंत्री गणेश नाईक यांनी माध्यमांशी बोलताना केलेल्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात निरनिराळ्या चर्चांना उधाण आले आहे. सध्या राजकीय वर्तुळात आणि दूरचित्रवाणीवर ज्या घडामोडींची चर्चा सुरू आहे, त्यांच्याशी आपल्या वक्तव्याचा थेट संबंध नसल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले असले तरी आगामी पाच-सहा महिन्यांत राजकारणात मोठ्या घडामोडी घडतील, असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.

या घडामोडी नेमक्या कोणत्या स्वरूपाच्या असतील, कोणत्या राजकीय पक्षांशी संबंधित असतील किंवा राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये यामुळे काही बदल होतील का, याबाबत त्यांनी अद्याप कोणतीही स्पष्टता दिली नसली तरी त्यांच्या या विधानामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून, सर्वांच्याच मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

आपण १९९० सालापासून जे भाकीत करत आलो आहोत, ते थोड्या उशिराने का होईना, पण खरे ठरते, असा दावा नाईक यांनी केला आहे. आपल्या विधानांचा संदर्भ स्पष्ट करताना त्यांनी सत्कर्म आणि दुष्कर्माच्या परिणामांचाही उल्लेख केला आहे. माणसाने सत्कर्म केले तर त्याला चांगली फळे मिळतात, तर दुष्कर्म केले तर त्याचे विषारी परिणाम भोगावे लागतात, हा निसर्गाचा नियम असल्याचे ते म्हणाले.

नाईक यांनी सध्याच्या व्हायरल ध्वनिमुद्रित संभाषणाशी आपल्या वक्तव्याचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले असले, तरी आगामी पाच-सहा महिन्यांत मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याच्या त्यांच्या भाकिताने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. त्यामुळे त्यांच्या या विधानाचा नेमका संदर्भ काय आणि राज्याच्या राजकारणात आगामी काळात कोणत्या घडामोडी घडतात, याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.