'ज्ञानेश ब्रो, इट्स डन ब्रो !' तरुणांसह विरोधकांनीही घेरले, ज्ञानेश कुमारांची विश्वासार्हता पणाला; राजीनाम्यासाठी दबाव वाढणार?
दिल्ली : खरा पंचनामा
निवडणूक आयोगातील अनियमिततेविरोधात देशभरात संतप्त वातावरण आहे. ज्ञानेश कुमार यांनी आयोगातील दोन निवडणूक आयुक्तांचा आक्षेप डावलून एकतर्फी निर्णय घेतल्याच्या आरोप करण्यात आला आहे, त्यामुळे देशातील विरोधी पक्ष आणि तरुणांनी रस्त्यावर उतरत ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.
मंगळवारी विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसद भवनापासून थेट निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत मोर्चा काढला. यावेळी "व्होट चोर, गद्दी छोड" आणि "डेमोक्रसी नॉट फॉर सेल" अशा घोषणांनी दिल्ली दणाणली होती.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, माकप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चापूर्वी राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर थेट ज्ञानेश कुमार यांना उद्देशून, "ज्ञानेश, इट्स डन ब्रो, टाइम टू रिसाईन" असे लिहिले. राहुल गांधी यांची निवडणूक आयोगाविरोधातील आक्रमक भूमिका रस्त्यावरदेखील दिसून आली.
इंडिया आघाडीचे नेते निवडणूक आयोगाकडे जाण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा पोलिसांनी विरोधकांची वाट अडवली पण विरोधक मागे हटले नाहीत. निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापासून काही मीटर अंतरावर पोलिसांनी बॅरिकेड्स उभारले होते. त्यानंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांना एकामागोमाग एक ताब्यात घेऊन पोलिसांच्या बसमध्ये कोंबण्यास सुरुवात झाली, त्यामुळे मोर्चा जवळजवळ संपल्याचे वाटत होते, घटनास्थळी काँग्रेसचे मोजकेच नेते राहिले होते.
मात्र, त्याचवेळी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी अचानक वेगळी भूमिका घेतली आणि पोलिसांसह उपस्थित विरोधी नेत्यांनाही आश्चर्याचा धक्का दिला. दुपारीच या आंदोलनाला सुरुवात झाली होती. संसद मार्गावर असलेल्या नीति आयोगाच्या कार्यालयाजवळ राहुल गांधी बॅरिकेडवर चढले आणि तिरंगा फडकावला. संध्याकाळी सुमारे आठच्या सुमारास पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह इतर विरोधी नेत्यांना ताब्यात घेण्यासाठी कारवाई सुरू केली, त्यामुळे आंदोलनाची सांगता होणार असे वाटत असतानाच गांधी भावंडांच्या अचानक हालचालींमुळे संपूर्ण आंदोलनाला वेगळे वळण मिळाले.
रस्त्यावर बसलेल्या विरोधी खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केली असताना राहुल गांधी बॅरिकेडवरून खाली उतरले. काही मिनिटांनी ते आकाशवाणी भवनाजवळ उभ्या असलेल्या पोलिसांच्या बसकडे धावले. त्या बसमध्ये प्रियंका गांधी बसल्या होत्या. राहुल बसमध्ये चढणार इतक्यात दोघांची नजरानजर झाली आणि प्रियंका खाली उतरल्या. त्यानंतर दोघांनीही पोलिसांना चकवा देत आकाशवाणी भवनाच्या दिशेने चाल केली.
आकाशवाणी भवनाच्या कर्मचाऱ्यांनी राहुल गांधी, प्रियंका गांधींना आत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, अखेर राहुल आणि प्रियंका गांधी दोघेही आत गेले आणि तेथेच आंदोलन सुरू केले. काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले, "हे नेमकं कसं घडलं आम्हालाही माहीत नाही. हा आधीच्या नियोजनाचा भाग नव्हता." आणखी एका काँग्रेसच्या खासदाराने म्हटले की, "दोघांच्या मनात नेमकं काय होतं हे त्यांनाच माहीत नव्हतं."
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर नीति आयोगाच्या कार्यालयाजवळ समाजवादी पक्षाचे नेतेही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. राहुल गांधी, प्रियंका गांधींसह सर्व नेत्यांनी "व्होट चोर, गद्दी छोड" आणि "डेमोक्रसी नॉट फॉर सेल" अशा घोषणा देत साडेदहा तास ठिय्या दिला.
यावेळी राहुल गांधी यांनी संतप्त होत प्रश्न उपस्थित केला, 'कोट्यवधी भारतीयांचे प्रतिनिधित्व करणारे खासदार आयोगासमोर आपली बाजू मांडण्यासाठी आले असताना आयोग त्यांची भेट का घेत नाही.' उलट पोलिसांकडून खासदारांना रोखले जात आहे आणि धमकावले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
काँग्रेस खासदार ज्योतिमणी यांनीही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. विरोधक लाठ्या-काठ्या आणि गोळ्यांनाही सामोरे जातील, पण ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्यासाठी आग्रही राहतील असे त्या म्हणाल्या. 'ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला पाहिजे, त्यांनी निवडणूक प्रक्रिया आणि लोकशाही उद्ध्वस्त केली,' असा आरोप केला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.