Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नागपुरात भाजपच्या पराभवाची वरिष्ठांकडून गंभीर दखल; फडणवीस-बावनकुळेंच्या भरोशावर किती दिवस प्रचार करणार? पक्षात चर्चा

नागपुरात भाजपच्या पराभवाची वरिष्ठांकडून गंभीर दखल; फडणवीस-बावनकुळेंच्या भरोशावर किती दिवस प्रचार करणार? पक्षात चर्चा 



नागपूर : खरा पंचनामा 

राज्यातील पाच विधानपरिषद जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने तीन, तर महायुतीने दोन जागांवर विजय मिळवला. या निकालात नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसने भाजपचा पराभव केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नागपुरात काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांनी भाजपचे सुधाकर कोहळे यांचा पराभव केला. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः प्रचारात सहभाग घेतल्यानंतरही भाजपला विजय मिळवता आला नाही. 

या पराभवाची भाजपच्या वरिष्ठ स्तरावरून दखल घेतली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भरोशावर आणखी किती दिवस प्रचार करायचा, असा सवाल प्रदेश पदाधिकाऱ्यांकडून उपस्थित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नागपूरमधील पराभव पक्षाच्या जिव्हारी लागल्याची चर्चा सुरू झाली आहे. नागपूर विभागात महायुतीचे मोठे संख्याबळ असतानाही पदवीधर मतदारसंघात पराभव का झाला, असा प्रश्न स्थानिक प्रदेश पदाधिकाऱ्यांना विचारण्यात आल्याची माहिती आहे. 

नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचा हा सलग दुसरा पराभव आहे. त्यामुळे सहा जिल्ह्यांमध्ये महायुतीचे आमदार आणि इतर लोकप्रतिनिधींचे पाठबळ असतानाही मतदारांचा कौल भाजपच्या बाजूने का वळला नाही, याचा शोध घेतला जाणार आहे. नागपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर या सहा जिल्ह्यांचा या पदवीधर मतदारसंघात समावेश होतो. या भागातील विधानसभेच्या ३२ जागांपैकी २६ आमदार महायुतीचे असून, त्यात भाजपचे २१ आमदार आहेत. याशिवाय विधानपरिषदेचे पाच सदस्य आणि राज्यसभेचे दोन खासदार असे राजकीय पाठबळही महायुतीकडे आहे. एवढे संख्याबळ असूनही त्याचे मतांमध्ये रूपांतर का झाले नाही, याचा वरिष्ठ पातळीवर आढावा घेतला जाणार असल्याचे समजते. 

या आढाव्यात स्थानिक आमदारांनी पदवीधर मतदारांशी किती संपर्क साधला, मतदार नोंदणीसाठी काय प्रयत्न केले, पदाधिकाऱ्यांना दिलेल्या जबाबदाऱ्या कितपत पार पडल्या आणि मतदानाच्या दिवशी नियोजन कसे होते, याची तपासणी होण्याची शक्यता आहे. तसेच प्रचारादरम्यान महायुतीतील घटकपक्षांमध्ये किती समन्वय होता, याचाही आढावा घेतला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सभांवरच प्रचार अधिक अवलंबून राहिल्याची चर्चा पक्षांतर्गत सुरू असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे नागपूरमधील पराभवाची कारणे शोधताना स्थानिक संघटनात्मक कामगिरी आणि मतदारांशी असलेला संपर्क यांचाही विचार केला जाणार आहे. 

या पराभवानंतर भाजपच्या प्रदेश संघटनेत काय बदल होतात आणि आगामी निवडणुकांसाठी कोणती रणनीती आखली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.