९ वर्षांपासून परागंदा असलेला आर्थिक फसवणुकीचा आरोपी जेरबंद
सांगलीच्या आर्थिक गुन्हे शाखेची धडक कारवाई
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
सांगली आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत गेल्या ९ वर्षे १० महिन्यांपासून न्यायालयाच्या कारवाईपासून परागंदा असलेल्या एका आरोपीस जेरबंद केले आहे. राजेंद्र रामचंद शिंदे (वय ५२ वर्षे, रा. हळभाग, वाळवा, जि. सांगली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
इस्लामपूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात हा आरोपी हवा होता. बँक ऑफ महाराष्ट्र शाखा इस्लामपूरचे वरिष्ठ व्यवस्थापक शितलनाथ वसंतराव बागी यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती. आरोपी राजेंद्र शिंदे आणि इतर ८० जणांनी संगनमत करून बँकेची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. आरोपींकडे जमीन नसताना किंवा कमी जमीन असताना खोटे ७/१२ उतारे, खोटे शिक्के व कागदपत्रे तयार करून ती बँकेत सादर करण्यात आली. याद्वारे बँकेची एकूण ३ कोटी २ लाख १४ हजार ८१८ रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे.
गुन्हा घडल्यापासून हा आरोपी तब्बल ९ वर्षे १० महिने लपून राहत होता आणि पोलिसांना गुंगारा देत होता. दरम्यान, सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपअधीक्षक स्वाती गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती. या पथकातील अधिकारी व अंमलदारांना मिळालेल्या खात्रीशीर बातमीनुसार, आरोपी राजेंद्र शिंदे हा वाळवा येथील हळभाग परिसरातील आपल्या घरी येणार असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून २७ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास आरोपीस पळून जाण्याची कोणतीही संधी न देता जागीच ताब्यात घेतले. त्यास अटक करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर करीत आहेत. सांगली पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे आर्थिक फसवणूक करून फरार झालेल्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
सहायक पोलीस निरीक्षक दिपक भांडवलकर, रमेश कोळी, संदीप मोरे, विशाल भिसे, सचिन मोरे यांनी ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
