सांगली, पुणे ग्रामीण, साताऱ्याची विजयी घोडदौड कायम
५२ वी कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचा तिसरा दिवस उत्साहात
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
सांगली येथील शहीद अशोक कामटे क्रीडा नगरी, पोलीस मुख्यालय मैदानावर ५२ वी कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०२६ चा तिसरा दिवस अत्यंत उत्साहात पार पडला. या क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या ६ वेगवेगळ्या घटकांमधील एकूण ११५० स्पर्धक पोलीस अधिकारी व अंमलदारांनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेत सांगली, पुणे ग्रामीण, साताऱ्याची विजयी घोडदौड कायम ठेवली आहे.
आजच्या तिसऱ्या दिवशी झालेल्या वैयक्तिक अॅथलेटिक स्पर्धांमध्ये पुरुष गटातील थाळीफेकमध्ये सांगलीचे परमेश्वर टोणे यांनी तर महिला गटात सांगलीच्या दिप्ती बनसोडे यांनी यश मिळवले. तसेच ३००० मीटर स्टीपल चेस पुरुष गटात साताराचे हर्षवर्धन दबडे, तर २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत पुरुष गटातून कोल्हापूरचे रमेश घुगे आणि महिला गटातून साताऱ्याच्या गौरी सावंत यांनी बाजी मारली. ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत पुरुष गटात कोल्हापूरचे ओंकार कुंभार तर महिला गटात सोनाली देसाई यांनी यश मिळवले. याशिवाय ज्युदो, तायक्वांदो, कुस्तीच्या विविध वजनी गटांमधील पुरुष व महिलांचे सामने तसेच इचलकरंजी येथील शंकरराव पुजारी जलतरण तलावावर विविध प्रकारच्या जलतरण स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.
सांघिक खेळांमध्ये साखळी पद्धतीने सामने खेळवले जात असून, व्हॉलीबॉल, फुटबॉल, कबड्डी, खो-खो, हॅण्डबॉल आणि हॉकी या खेळांचे पुरुष व महिला गटातील सेमी फायनल सामने सुरू आहेत. २५ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धा दररोज सकाळी ६:३० वाजल्यापासून रात्री १०:०० वाजेपर्यंत पार पडत आहेत. या क्रीडा स्पर्धा नागरिकांनादेखील प्रत्यक्ष पाहण्यासाठी खुल्या असून, क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी केले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.