इंदोर : खरा पंचनामा
पोलीस प्रशिक्षण केंद्रात चालक पदावर कार्यरत असलेल्या एका हेड कॉन्स्टेबलच्या निवासस्थानी छापा टाकला असता त्याच्याकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असल्याचं समोर आलंय. इंदौरमध्ये लोकायुक्त पोलिसांच्या कारवाईत याचा खुलासा झाला आहे.
फिरोज खान असं हेड कॉन्स्टेबलचं नाव आहे. त्यांना आतापर्यंत मिळालेल्या अधिकृत उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती असल्याचं छाप्यात आढळलं. कुटुंबिय, जवळचे सहकारी आणि त्यांच्या कंपन्यांच्या नावे ही मालमत्ता आहे. तब्बल ६४ कोटींची मालमत्ता आढळून आलीय.
ड्युटीवर दीर्घकाळ गैरहजर राहणं, पदाचा वापर करून वादग्रस्त मालमत्तांचे व्यवहार केल्याची तक्रार फिरोज खान विरोधात केली होती.
प्राथमिक चौकशीनंतर तक्रारीत तथ्य असल्याचं समोर आलं. यानंतर फिरोज खान याच्यासह रोशनी वर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक चौकसी केली जात आहे.
फिरोज खान यांच्या इंदूर आणि देवास जिल्ह्यातील ठिकाणांवर लोकायुक्तांच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत अनेक कागदपत्रे, फाइल्स आणि डिजिटल पुरावे आढळून आले आहेत. यात जवळपास ४६ मालमत्ता असून घर, शेत जमीन, निवासी आणि व्यावसायिक भूखंडांचा समावेश आहे.
जमीन, घरांची किंमत सरकारी दरानुसार १७ कोटी रुपयांपर्यंत आहे. मात्र सध्याच्या बाजारभावानुसार ही किंमत जवळपास ६४ कोटींहून अधिक असल्याचं लोकायुक्तांनी म्हटलंय.
इंदूरमधील विविध भागात एका खासगी कंपनीच्या नावावर खरेदी केलेली शेतीची जमीनही समोर आली. ही कंपनी खान यांच्या पत्नी हीना आणि युवराज पंवार यांच्या संयुक्त सहभागातून चालवली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
फिरोज खान गेल्या २४ वर्षांपासून पोलीस दलात कार्यरत आहेत. या काळात त्यांना वेतनापोटी एकूण ७५ लाख रुपये मिळाले आहेत. त्यांचे वैध उत्पन्न आणि त्यातून होणारी कमाई ही १ कोटी ९४ लाख इतकी असल्याचा अंदाज लोकायुक्तांनी व्यक्त केला. मात्र छाप्यात आढळलेली मालमत्ता तब्बल ६४ कोटींची असल्यानं इतकी माया कशी जमवली? याचा तपास करण्यात येत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
