"आमचा काही संबंध नाही..." शिवसेना नेत्याचा चिवटेंना धक्का; अर्ज भरण्यापूर्वीच मोठा ट्विस्ट, पुणे शिक्षक मतदारसंघात मोठ्या घडामोडी
पुणे : खरा पंचनामा
राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ विधान परिषद निवडणूक जाहीर झाल्यानंतर महायुतीमध्ये बंडाचे निशाण फडकले आहे. पुणे शिक्षक मतदारसंघातून भाजपने उमेदवार जाहीर झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटातील इच्छुकांनी नाराजी व्यक्त करत पक्षाच्या नेत्यांकडे उमेदवारीसाठी साकडे घातले आहे.
तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे समज्ले जाणारे मंगेश चिवटे बंडाच्या तयारीत असताना दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराने मोठं खळबळजनक वक्तव्य केलं आहे. चिवटे यांच्या उमेदवाराशी आमचा काहीही संबंध नसल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी म्हटले.
पुणे शिक्षक मतदारसंघाची जागा भाजपच्या वाट्याला गेली असून, भाजपने कौस्तुभ गावडे यांची उमेदवारीही घोषित केली आहे. मात्र, या निर्णयामुळे नाराज झालेले शिवसेना (शिंदे गट) मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मंगेश चिवटे बंडखोरीवर ठाम आहेत. मंगळवारी ते मोठे शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची चर्चा आहे. या अर्जाच्या वेळी शिवसेनेचे स्थानिक नेते उपस्थित राहणार असल्याची चर्चा रंगलेली असतानाच, सुरुवातीपासून चिवटेंचे खंदे समर्थक मानले जाणारे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी ऐनवेळी माघार घेत मोठा धक्का दिला आहे.
एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना शहाजी बापू पाटील यांनी म्हटले की, "पुणे शिक्षक आणि पदवीधर या दोन्ही जागा वरिष्ठ पातळीवर झालेल्या निर्णयानुसार भाजपकडे गेल्या आहेत. त्यामुळे मंगेश चिवटे उद्या जरी उमेदवारी अर्ज दाखल करत असले, तरी त्याच्याशी आमचा काहीही संबंध नसेल. अर्ज दाखल करताना आम्ही त्यांच्यासोबत जाणार नसल्याचे शहाजी बापू पाटील यांनी म्हटले. आमचा पाठिंबा मंगेश चिवटे यांना वैयक्तिक नसून शिवसेनेलाच असल्याचे स्पष्ट केले आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच वरिष्ठ नेत्याने हात वर केल्यामुळे बंडखोरीच्या तयारीत असलेले मंगेश चिवटे एकाकी पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून, आता ते माघार घेणार की बंडखोरीवर ठाम राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघातून राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ओएसडीदेखील निवडणुकीाच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा सुरू होती. शिंदे गटाच्या नेत्यांनीदेखील हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात यावा असे म्हटले होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.